नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम 

निफाड थंडी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

निफाडमध्ये तापमानातील चढ-उतार कायम असून, साेमवारी (दि. १६) आठवड्याच्या पहिल्या दिवशी पारा ६.५ अंश सेल्सिअस इतका नोंदविण्यात आला. अवघ्या तालुक्यात थंडीचा कडाका कायम असल्याने निफाडवासीय गारठले आहेत. नाशिकम‌ध्येही प्रचंड गारठा जाणवत आहे.

उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींचा वेग कायम आहे. त्याचा परिणाम अवघ्या जिल्ह्याच्या तापमानावर जाणवत आहे. गेल्या २४ तासांत निफाडच्या पाऱ्यात काही अंशांची वाढ झाली. थंडीमुळे तालुक्यातील जनजीवन कोलमडले आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळची शेतीचे कामे ठप्प पडली आहे. थंडीपासून बचावासाठी तालुकावासीय शेकोट्यांभोवती गर्दी करत आहेत. दरम्यान, नाशिकचा पारा १०.५ अंशांवर आला असला, तरी रात्रीच्या वेळी वाहणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे शहरवासीयांना हुडहुडी भरत आहे. तसेच पहाटेच्या सुमारास धुक्यात शहर हरवून जात आहे. जिल्ह्याच्या अन्य भागांतही थंडीची लाट सुरूच आहे.

हे वातावरण रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकासाठी उपयुक्त असले, तरी काढणीला आलेल्या द्राक्षबागांसाठी ते नुकसानकारक आहे. थंडीमुळे द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता बळावली असून, पिकात साखर उतरण्याच्या प्रक्रियेवरही त्याचा परिणाम होऊ शकताे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. जिल्ह्यात पुढील ३ ते ४ दिवस जिल्ह्यात थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम  appeared first on पुढारी.