नाशिकच्या पानेवाडीत बारसूची पुनरावृत्ती, पेट्रोलियम कंपनीच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध

नाशिक मनमाड,www.pudhari.news

मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने इंधन साठवणूक डेपोच्या विस्तारासाठी शेतजमीन संपादीत करण्याकरीता मोजणी करण्यास सुरुवात केली. मात्र शेतकऱ्यांनी त्याला कडाडून विरोध केला. कंपनीचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात बळजबरीने जमीन मोजणी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून महिला शेतकऱ्यांनी थेट रेल्वे रुळावर धाव घेतली. मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच रुळावरून हटविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

एकीकडे शेतकऱ्यांच्या विरोधामुळे बारसु रिफायनरी प्रकल्प गाजत असताना मनमाडच्या पानेवाडीत देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जीव गेला तरी चालेल पण जमिनी देणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी केला असून जमिनी पाहिजे असेल तर आमच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरी देऊन समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केला आहे.

मनमाड पासून 7 किमी अंतरावर पानेवाडी शिवारात हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे इंधन साठवणूक डेपो असून कंपनीला त्याचे विस्तार करून इंधन वाहतुकीची लोडिंग-अनलोडिंग करण्यासाठी सुमारे 35 ते 40 एकर जमिनीची गरज आहे. कंपनीच्या डेपोजवळ रेल्वे रूळ आणि या भागातून जाणाऱ्या महामार्गाला खेटून शेतीजमीन संपादित करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. ही जमीन वडिलोपार्जित असून पिढ्या न पिढ्या शेतकरी ही जमीन कसत आले आहेत. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने त्यांच्या डेपोचा विस्तार करण्यासाठी या जागेची निवड करून शासनाकडे जमीन संपादित करण्याची मागणी केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना 3 ते 4 वेळा नोटीसी पाठविण्यात आल्या आहेत. सोमवारी कंपनीचे डेपो प्रबंधक अनिल मेश्राम, किरण मेहत्रे आणि बी. पी. मीना हे तिघे पोलिसांचा फौजफाटा आणि भूमिलेखा विभागाच्या अधिकाऱ्याला सोबत घेऊन मोजणीसाठी आले होते, मात्र शेतकऱ्यांनी या मोजणीला कडाडून विरोध केला. त्यांच्या विरोधाला न जुमानता अधिकारी बळजबरीने जमीन मोजणीचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी थेट शेजारी असलेल्या रेल्वे रुळावर धाव घेतली.  जेंव्हा महिला रुळावर गेल्या तेंव्हा एका बाजूने रेल्वे गाडी येत होती; अखेर पोलिसांनी वेळीच धाव घेऊन त्यांना रुळावरून बाजूला केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. शेतकऱ्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहून कहर मोजणी न करताच अधिकारी परत निघून गेले.

आमची बागायीत आणि वडिलोपार्जित शेती असून आमचं उदरनिर्वाह तीच्यावर आहे. तिच आमच्याकडून हिरावून घेणार असाल तर मग आम्ही जगावे कसे असा प्रश्न पडला असून आम्हाला नोकरी आणि काही रक्कम देण्याचे सांगितले जात आहे. पैसे घेउन ते खर्च झाल्यावर आम्ही भीक मागायाची का ? जमीन पाहिजे असेल तर आमच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीत कायम नोकरीं देऊन आम्हाला जमीनीचा मोबदला द्या.

– बाळासाहेब सांगळे, शेतकरी.

…………………

माझे पती आणि मुलाचे निधन झाले आहे. मी सून आणि 10 वर्षाच्या नातवासोबत राहते. आमच्याकडे जमिनीचा एक तुकडा असून त्याच्यावर आम्ही जीवन जगत आहे,जर जमीन आमच्या कडून हिरावून घेतली तर आम्ही कुठ जावं ? कसं जगावं अशी धास्ती मला, माझ्या सुनेला आणि नातवाला पडली आहे.

– दगूबाई उत्तम वाघ

आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जमीन मोजणीसाठी आलो आहोत. आमची शेतकऱ्यांसोबत बैठक झाली आहे. मात्र ते कायमस्वरूपी नोकरी मागत असून आम्ही त्यांना तात्पूरती नोकरी देण्यास तयार आहोत.

..अनिल मेश्राम, डेपो प्रबंधक, एचपीसीएल, पानेवाडी.

हेही वाचा : 

The post नाशिकच्या पानेवाडीत बारसूची पुनरावृत्ती, पेट्रोलियम कंपनीच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध appeared first on पुढारी.