नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या प्रसिद्ध फाळके स्मारकाच्या नूतनीकरणाला अखेर मुहूर्त लागणार आहे. नूतनीकरणाच्या प्रस्तावाला चार वर्षांपूर्वीच मंजुरी मिळूनही अपेक्षित प्रतिसाद अन् निधीची चणचण असल्याने, काम रखडले होते. पर्यटन विभागाने ४० कोटींचा निधी उपलब्ध केल्याने स्मारकाच्या नूतनीकरणाचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे.
महापालिकेने १९९९ मध्ये पाथर्डी शिवारातील त्रिरश्मी लेण्यांच्या पायथ्याशी २९ एकर जागेत चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाची उभारणी केली होती. सुरुवातीला महापालिकेचे आर्थिक उत्पन्नाचे साधन बनलेल्या या प्रकल्पाची कालांतराने दुरवस्था होऊन प्रकल्प तोट्यात गेला. पुनर्विकास साधण्याची योजना आणल्यानंतर निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिका मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत या खासगीकरणाच्या प्रक्रियेला विरोध दर्शवित महापालिकेच्या माध्यमातूनच हा प्रकल्प विकसित करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे खासगीकरणाची निविदा प्रक्रिया रद्द करत स्वनिधीतून पुनर्विकास करण्याचे निश्चित केले. त्यासाठी तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी सल्लागार नियुक्तीसाठी ९ आॅगस्टपर्यंत निविदा सादर करण्याची मुदत दिली होती. मात्र, या मुदतीत केवळ एकाच एजन्सीची निविदा प्राप्त झाल्यामुळे अन् मुदतवाढ देऊनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने, नूतनीकरणाची प्रक्रिया रखडली होती.
दरम्यान, स्मारकाच्या नूतनीकरणासाठी पर्यटन विभागाकडूनच ४० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याने, लवकरच नूतनीकरणाचे काम हाती घेतले जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिकेने फाळके स्मारकाच्या तिकिटाचे दर वाढविले होते. मात्र, सुविधा नसल्याने पर्यटकांनी त्याकडे पाठ फिरवल्याने, महापालिकेच्या तिजोरीवर याचा परिणाम झाल्याचे दिसून आले.
दादासाहेब फाळके स्मारकाच्या नूतनीकरणासाठी पर्यटन विभागाकडून ४० कोटींचा निधी प्राप्त होणार आहे. त्यातून नूतनीकरणाचे काम केले जाणार आहे.
– भाग्यश्री बानायत, प्रभारी आयुक्त, मनपा
हेही वाचा :
- पिंपरी : शाळेजवळ तंबाखू, सिगारेट विक्री करणार्या टपर्यांवर कारवाई
- न्यूझीलंड संघात भारतीय वंशाचा आदित्य अशोक
- इर्शाळवाडी दुर्घटना : सगळी परिस्थिती हाताबाहेरची होती
The post नाशिकच्या फाळके स्मारकाचे रुपडे पालटणार, नूतनीकरणासाठी ४० कोटींचा निधी appeared first on पुढारी.