नाशिकच्या बेपत्ता व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

भाऊसाहेब गुंजाळ www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर)  : पुढारी वृत्तसेवा

शहरापासून जवळच अंजनेरी-मुळेगाव रस्त्यालगतच्या डोंगर कपारीत बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह शनिवारी (दि. 4) दुपारी आढळला आहे. मृत व्यक्ती विहितगाव (नाशिक) येथील असून नाव भाऊसाहेब ठकाजी गुंजाळ (47) असे आहे.

भाऊसाहेब गुंजाळ हे 2 मार्च 2023 पासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी अंबड पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तसेच सोशल मीडियावर त्यांचा फोटो व्हायरल केला होता. अंजनेरी-मुळेगाव रस्त्यावर प्रतीकेदारनाथ मंदिरापुढे घाट रस्त्याच्या बाजूला हॉटेल निसर्ग कट्टाजवळ दुचाकी उभी करून भाऊसाहेब डोंगराच्या दिशेने गेले होते. तसेच त्यांच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन हॉटेलसमोरच्या शेतात डोंगरालगत आढळले होते. नातेवाइकांनी शोध घेत मुळेगाव बारी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने त्यांच्याशी संपर्क साधला. पोलिस उपनिरीक्षक रमेश आहिरे यांनी भाऊसाहेब यांच्या शेवटच्या मोबाइल लोकेशनच्या आधारे स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने डोंगरावर शोध घेतला. त्यावेळी भाऊसाहेब यांचा मृतदेह डोंगराच्या कपारीत आढळला.

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे भाऊसाहेब यांना ट्रेकिंगची आवड होती. या परिसरात आल्यानंतर डोंगरावर जाऊन पाहावे म्हणून ते गेले असावेत. मात्र, घसरल्याने खडकावर आपटून त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. भाऊसाहेब खडकावर घसरत गेल्याच्या खुणा शरीरावर आणि बाजूच्या जागेवर आढळल्या आहेत. दरम्यान मृतदेह सापडलेल्या ठिकाणाहून झोळी करून खाली आणण्यात आला. याबाबत वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस उपनिरीक्षक रमेश आहिरे आणि सहकारी अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिकच्या बेपत्ता व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू appeared first on पुढारी.