नाशिकच्या भूमिपुत्राला सलग दुसऱ्यांदा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार

योगराज जाधव www.pudhari.news

नाशिक (निफाड ):  पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्याच्या निफाड येथील भूमिपुत्र असलेल्या योगराज जाधव या तरुण पोलीस अधिकाऱ्याने गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल प्रभावित क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सलग दुसऱ्यांदा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळवण्याचा पराक्रम केला आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी या नक्षलग्रस्त भागामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर काम करणाऱ्या योगराज रामदास जाधव यांना शासनाने यावर्षीचा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर केला आहे. जाधव यांनी यापूर्वी देखील हा पुरस्कार मिळवला असल्याने दोन वेळा राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानित केले जाणाऱ्या या अधिकाऱ्याचे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. योगराज जाधव यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण हे निफाडच्या जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये झाले असून माध्यमिक शिक्षण हे वैनतेय विद्यालय निफाड येथे झाले आहे. 12वी आणि पदवीपर्यंतचे शिक्षण निफाड येथीलच कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालयात झाले आहे. पुणे विद्यापीठातून त्यांनी शारीरिक शिक्षणातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असून 2015 साली पोलीस खात्यामध्ये ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले. धुळे येथे एक वर्ष सेवा बजावल्यानंतर 2017 पासून आजपर्यंत ते गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागामध्ये विशेष अभियान पथक सी 60 मध्ये कार्यरत आहेत. या कालावधीत अनेक नक्षल विरोधी मोहिमांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवलेला असून उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना यंदा सलग दुसऱ्यांदा राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित केले जात आहे. त्यांचे वडील हे महसूल खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांची बहीण देखील पोलीस खात्यामध्येच अधिकारी म्हणून मुंबई येथे कार्यरत आहे.

हेही वाचा:

The post नाशिकच्या भूमिपुत्राला सलग दुसऱ्यांदा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार appeared first on पुढारी.