नाशिकच्या महापालिका निवडणुकीची तयारी मे महिन्यापासून; प्रशासनाने बोलाविली बैठक

नाशिक : पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकांची तयारी राजकीय पातळीवर सुरु झाली असताना निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासन मे महिन्यात तयारी करणार आहे. पहिल्या बैठकीत मागील निवडणुकांचा आढावा घेण्याबरोबरच त्रुटी दुर करण्याचे नियोजन केले जाणार असल्याने प्रशासनाकडून निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. 

महापालिका सहा पंचवार्षिक निवडणुका झाल्या असून, जानेवारी २०२२ मध्ये सातव्या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे जाणार आहे. १९९२ च्या पहिल्या निवडणुकीत शहराची लोकसंख्या कमी असल्याने निवडणुकीचे नियोजन मर्यादीत होते. त्यावेळी कॉंग्रेसची सत्ता महापालिकेत आली होती. सन १९९७ च्या निवडणुकीत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. अपक्षांच्या मदतीने शिवसेनेने प्रथमच सत्ता मिळविली होती. या निवडणुकीत मतदार वाढले होते. २००२ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. सिंहस्थामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. मीडिया क्रांतीमुळे नाशिकचा कुंभमेळा जगभर पोहोचला होता. २००७ च्या निवडणुकीत लोकसंख्येने दहा लाखांचा आकडा पार केल्याने प्रभागांची संख्या वाढली. या निवडणुकीत प्रथमच तीन सदस्यांचा एक प्रभाग रचना अस्तित्वात आली होती. अपक्षांच्या मदतीने शिवसेनेने सत्ता काबिज केली. २०११ च्या जनगणनेत पंधरा लाखांपर्यंत लोकसंख्या पोहोचली. त्यानुसार २०१२ च्या निवडणुकीत वॉर्ड संख्या वाढली. या निवडणुकीत मनसेने सत्ता काबिज केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत बहुसदस्यीय म्हणजे चार नगरसेवकांचा एक प्रभाग अस्तित्वात आला. महापालिकेत प्रथमच भाजपने पूर्ण बहुमताने सत्ता काबिज केली. आता २०२२ मध्ये महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिकसाठी निवडणुक होणार असून, राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची महत्वपूर्ण भूमिका प्रशासनाला पार पाडावी लागते. त्यादृष्टीने मे २०२१ मध्ये निवडणुक तयारीसाठी महत्वपूर्ण बैठक घेतली जाणार असून, त्यासाठी १८ मे तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. यानिवडणुकीत निवडणुक कामांचे सादरीकरण सादर करण्याच्या सूचना प्रशासन उपायुक्तांना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या आहेत. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

यंदा मतदार वाढणार 

केंद्र सरकारकडून दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. त्या आधारे १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांची यादी तयार केली जाते. २०११ च्या जणगणनेनुसार आतापर्यंतच्या निवडणुका पार पडल्या आहे. १४ लाख ८६ हजार शहराची लोकसंख्या आहे. नवीन जनगणनेत वीस लाखांपर्यंत लोकसंख्या पोहोचणार असल्याचा अंदाज आहे. त्या अनुशंगाने मतदारांची संख्या वाढणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय