नाशिकच्या लोहोणेर येथील सराफाची चिठ्ठी लिहून आत्महत्या

नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील सराफ व्यावसायिक धनंजय अशोक वानखेडे (50) यांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.21) सकाळी उघडकीस आली. धनंजय हे घरातून बेपत्ता असल्याबाबत नातेवाइकांनी शनिवारी (दि.20) सायंकाळी सटाणा पोलिसांत तक्रार नोंदवली होती. पोलिस, कुटुंबीय, मित्र व सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. तपासादरम्यान दोधेश्वरजवळ रस्त्यावर त्यांची स्कूटी आढळून आली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत त्यांचा परिसरातील जंगलात शोध घेण्यात आला, परंतु ते मिळून आले नाहीत. पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.21) सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू केली असता दोधेश्वरजवळ जंगलात एका ठिकाणी त्यांचा मृतदेह आढळून आला.

मृतदेहाजवळ चपला व पाण्याची बाटली मिळून आली. त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दुपारून त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. धनंजय यांच्या मृतदेहासोबत एक चिठ्ठी मिळून आली. या चिठ्ठीत चार ते पाच जणांचा नामोल्लेख असून, दुकानातील खाकी वहीत मला होत असलेल्या त्रासाबद्दल सविस्तर लिहिले आहे, असा उल्लेखही चिठ्ठीत असल्याचे पोलिसांकडून समजते. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार पुढील तपास करीत आहेत. धनंजय यांच्याजवळ मिळून आलेली चिठ्ठी आणि त्यातील नावे यावरून शहरात दिवसभर उलटसुलट चर्चा होताना दिसून आली. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा :

The post नाशिकच्या लोहोणेर येथील सराफाची चिठ्ठी लिहून आत्महत्या appeared first on पुढारी.