नाशिकच्या विमानसेवेला जबरदस्त प्रतिसाद! जानेवारी महिन्यात १७ हजार प्रवाशांचे उड्डाण 

नाशिक : नाशिक मधून विमानसेवेला प्रतिसाद मिळेल की नाही याबाबत अनेकदा प्रश्‍न चिन्ह निर्माण करून विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतू जानेवारी महिन्यात नाशिकच्या ओझर विमानतळावरून दिल्ली, हैद्राबाद व अहमदाबाद साठी तब्बल सतरा हजार प्रवाशांनी प्रवास केल्याचा अहवाल नुकताचं प्राप्त झाला असून यावरून विमानसेवेने चांगलेच उड्डाण घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. 

..निरंतर विमानसेवेवर शिक्कामोर्तब

एचएएलच्या ओझर विमानतळावर टर्मिनल उभारण्यात आल्यानंतर सन २०१८ मध्ये विमानसेवेला प्रारंभ झाला. एअर डेक्कन कंपनीच्या मुंबई, पुणे हवाई प्रवासाला अनियमितते मुळे प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत विमानसेवा सुरु झाली. आचके खात सुरु झालेल्या विमान सेवेवर अनेकदा प्रश्‍न चिन्ह निर्माण करण्यात आल्याने सेवा बंद पडते कि काय अशी भिती व्यक्त केली जात होती परंतू प्रवाशांच्या प्रतिसादाने जानेवारी महिन्यात नवा विक्रम केल्याने निरंतर विमानसेवेवर शिक्कामोर्तब झाले आहे. अलायन्स एअर कंपनीच्या वतीने अहमदाबाद, हैद्राबाद, पुणे. स्पाईसजेट कंपनीच्या वतीने दिल्ली, पुणे, बेंगलुरु, ट्रुजेट कंपनीच्या वतीने अहमदाबाद तर स्टार एअरवेज कंपनीच्या वतीने बेळगाव हवाई सेवा सुरु आहे. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

जानेवारीत हवाई सेवेचा विक्रम 

जुलै ते डिसेंबर २०१८ या कालावधी मध्ये नऊ हजार प्रवाशांनी प्रवास केला. जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीतील नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक बारा हजार प्रवाशांनी विमानाने प्रवास केला. मार्च ते जुलै २०२० या कालावधीत लॉकडाऊन असल्याने अत्यल्प प्रतिसाद मिळाला देशांतर्गत हवाई सेवा सुरु झाल्यानंतर नोव्हेंबर २०२० मध्ये सर्वाधिक पंधरा हजार प्रवाशांनी ओझर विमानतळावरून देशातील प्रमुख शहरांमध्ये उड्डाण केले. जानेवारी २०२१ मध्ये सर्वाधिक १७ हजार प्रवाशांनी विमान प्रवास केल्याने नाशिकच्या विकासातील हा मैलाचा दगड ठरणार आहे. 

वाहतुक व्यवस्था बळकटीला हातभार 

नाशिकची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बळकट करण्यासाठी काही दिवसात महापालिकेच्या वतीने शहर बससेवा सुरु केली जाणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी दोन हजार ९२ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ हवाई सेवेला चांगला प्रतिसाद मिळतं असल्याने अंतर्गत व बाह्य कनेक्टिव्हीटी नाशिक मध्ये वाढतं असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

प्रवाशी विमानसेवेला प्रतिसाद मिळाल्याने नाशिकच्या उद्योग, व्यवसाय, पर्यटनाला चालना मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक वर्दळीचे ओझर विमानतळ ठरले आहे. वर्षाअखेर पर्यंत देशातील आणखी पंधरा प्रमुख शहरांमध्ये हवाई सेवा सुरु करण्याचे प्रयत्न आहे.- मनिष रावल, चेअरमन, एव्हीएशन कमिटी, नाशिक.