नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा
विहितगावमध्ये दोघा गुंडांनी मथुरा चौक येथील रामकृष्ण हरी प्राईड सोसायटीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच ते सहा दुचाकी ज्वलनशिल पदार्थ टाकून जाळल्या. तसेच उभ्या असलेल्या एक टेम्पोची काच फोडून रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहनांवर हल्ला करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विहितगाव येथील मथुरा चौकात रामकृष्ण हरी प्राईड ही भव्य इमारत आहे. रात्री एक वाजेच्या सुमारास दोन दहशत माजवणाऱ्या गुंडांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच ते सहा महागड्या दुचाकी पेट्रोल ओतून जाळून टाकल्या. हातात कोयते घेत जवळच असलेल्या मालवाहू टेम्पोवर हल्ला चढवून त्याच्या काचा फोडून नुकसान केले. त्यानंतर या गुंडांनी विहितगाव, मथुरा चौकात येऊन रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहनांवर कोयत्याने हल्ला केला. तसेच या गुंडांनी मध्यरात्रीच्या सुमारास हातात कोयता मिरवत दहशत निर्माण केली.
घटनेची माहिती समजताच उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व पथक घटनास्थळी दाखल झाले. आज सकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता सोसायटीतील रहिवासी आक्रमक झाले व त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केल्या. गुंडांना लवकरच ताब्यात घेतले जाईल व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस निरीक्षक पगारे यांनी दिले. नाशकात पुन्हा वाहनांची तोडफोड, जाळणे हे प्रकार होत असून सिडकोनंतर आता नाशिकरोड परिसरातही दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य होत आहे..
हेही वाचा :
- कोल्हापूर : केळोशी बु येथील अपघातात आपटाळ येथील एकाचा जागीच मृत्यू
- खेड : लम्पी लसीकरणास टाळाटाळ
- नांदूरपठार-कळस अंतर आता 5 कि.मी !
The post नाशिकच्या विहितगावला दोघा गुडांनी पाच ते सहा दुचाकी जाळल्या appeared first on पुढारी.