नाशिकच्या शेकडो गुरुजींचा हक्काच्या पगारासाठी आझाद मैदानावर एल्गार

येवला (जि.नाशिक) : मागील १२ ते १५ वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी वीस टक्के व ४० टक्के अनुदान घोषित केले मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने राज्यातील शिक्षकांचे आझाद मैदानावर शुक्रवार पासून विराट आंदोलन सुरू झाले आहे.

अनुदानासाठी शिक्षकांचे आझाद मैदानावर विराट आंदोलन!
जिल्ह्यातील ही शेकडो शिक्षकांनी या आंदोलनात सहभाग घेतला असून शासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे त्वरित अनुदान वितरणाची अंमलबजावणी करून शिक्षकांना दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
राज्यातील सुमारे दोन हजार प्राथमिक,माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील ४३ हजार शिक्षकांच्या अनुदानाचे शासनाने भिजत घोंगडे ठेवले आहे.अनुदानासाठी गेल्या अकरा वर्षात राज्यातील शिक्षकांनी ३०० ते ३५० आंदोलने केले,यासंदर्भात राज्यकर्त्यांनी वेळोवेळी शंभरावर आश्वासने दिले अन डझनावर जीआर काढले पण वेतन देण्याची कृती न केल्याने विनाअनुदानित तत्वावर काम करणारे हजारों शिक्षक उपाशीपोटीच ज्ञानार्जन करत आहेत.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

नाशिक विभागातील शेकडो गुरुजींचा हक्काच्या पगारासाठी एल्गार 

राज्यातील २७६ प्राथमिक शाळा,१०३१ तुकड्यावरील २ हजार ८५१ शिक्षक,१२८ माध्यमिक शाळा व ७९८ तुकड्यावरील २१६० शिक्षक तर १७६१ उच्च माध्यमिक शाळा व ५९८ तुकड्यावरील ९ हजार ८८४ शिक्षकांना २० टक्के अनुदान जाहीर करण्यात आले आहे.तर २ हजार ४१७ शाळा,७५६१ तुकड्यावरील २८ हजार २१७ शिक्षक ४० टक्क्यांसाठी घोषित करण्यात आले आहे. १४ ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रतिक्षेतील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना १ नोव्हेंबरपासून २० टक्के अनुदान तर यापूर्वी २० टक्के अनुदान घेणाऱ्यांना ४० टक्के अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता.याची १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी अपेक्षित असतांना शासनाने अद्यापही कुठलाच निर्णय घेतलेला नाही.यामुळे राज्यातील या ४२ हजार शिक्षकाचा भ्रमनिरास झाला आहे.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

उपाशीपोटी किती दिवस ज्ञानार्जन करणार?
राज्यातील शिक्षकांना अनुदानासाठी आता पुन्हा वाट पाहत बसण्याची वेळ सरकारने आणली आहे.१३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार अनुदानास पात्र प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची यादी जाहीर झाली आहे.अनुदानाअभावी राज्यातील हजारो कुटुंबीय उघड्यावर आले आहे आतापर्यंत तीस ते पस्तीस जणांचे बळी वेतनाच्या प्रतीक्षेत गेले असून शासन मात्र शिक्षकांच्या भावनांचा खेळ करत आहे.उपाशीपोटी किती दिवस ज्ञानार्जन करणार असा सवाल करून हजारो शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे विविध संघटनांनी एकत्रित येऊन समन्वय संघामार्फत एल्गार पुकारला असून निधी वितरणाचा शासन आदेश निर्गमित झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका ही आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

 

“उपाशीपोटी काम करण्याची विनाअनुदानित शिक्षकांवर वेळ शासनाने आणून ठेवली आहे.त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन मोठा लढा उभारला आहे.शाळा तपासण्या पूर्ण झालेल्या आहेत.तरी शासनाने प्रचलित नियमानुसार निधी वितरणाचा आदेश तात्काळ निर्गमित होईपर्यंत शिक्षक आझाद मैदान सोडणार नाही.होणाऱ्या परिणामांना महाविकास आघाडी सरकार जबाबदार असेल.”
-कर्तारसिंग ठाकूर,कार्याध्यक्ष,म.रा.उच्च माध्यमिक कृती संघटना