नाशिकच्या सायलीची ऐतिहासिक कामगिरी; राष्ट्रीय टेबल टेनिस स्‍पर्धेत पटकावले सुवर्ण 

नाशिक : इंदूर (मध्य प्रदेश) येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना नाशिकच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. सायली वाणी हिने उत्‍कृष्ट कामगिरी करताना मुलींमध्ये सबज्‍युनिअर गटात अजिंक्‍यपदासह सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीसोबतच सायलीने नाशिकच्या टेबल टेनिसच्या इतिहासात नवीन इतिहास रचला आहे.

नाशिकच्‍या तनिषा कोटेचा हिनेदेखील स्‍पर्धेत कांस्‍यपदक पटकावले आहे. 
बिगर मानांकित सायली वाणी हिने प्राथमिक फेरीतील आपले सर्व सामने जिंकून मुख्य फेरीत प्रवेश मिळविला. उपांत्य पूर्व फेरीत तिने उत्तर प्रदेशच्या भारती वर्तिका हिचा ४-१ ने पराभव करत खळबळ माजवली. उपांत्य फेरीत द्वितीय मानांकित महाराष्ट्राच्या पृथा वरतीकर हिचा ४-० ने एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीमध्येही साजेशी कामगिरी करताना हरियानाचा प्रथम मानांकित सुहाना सैनी हिचा ४-३ ने रोमहर्षक लढतीती पराभव करून अजिंक्यपद पटकाविले. सायली वाणी ही प्रशिक्षक जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे सराव करते. 

हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..

नाशिकच्या तनिषा कोटेचा हिनेदेखील उत्‍कृष्ट कामगिरी करत मुलींमध्ये सबज्युनिअर गटात कांस्यपदक पटकावले. तनिषाने उपांत्य फेरीत खेळण्याआधी उपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित काशवी गुप्ता हिचा ४-० ने सहजरीत्या पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. परंतु उपांत्य फेरीत हरियानाचा प्रथम मानांकित सुहाना सैनी हिच्याकडून अटीतटीच्या लढतीत ४-३ ने पराभव स्वीकारावा लागला. यातून तिला स्‍पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. 

 हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

सायली आणि तनिषाच्‍या कामगिरीबद्दल अर्जुन पुरस्कार राष्ट्रीय विजेता कमलेश मेहता, नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, राज्य संघटनेचे राजीव बोडस, प्रकाश तुळपुळे, यतीन टिपणीस, संजय मोडक, संघटनेचे सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड आदींनी अभिनंदन केले.