Site icon

नाशिकच्या हवेला ट्रॅफिक, धुलिकणांची बाधा ; गुणवत्ता खालावण्यात ११ क्षेत्रे कारणीभूत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध असलेली नाशिकच्या हवेची गुणवत्ता खालावण्यात ११ क्षेत्रे कारणीभूत ठरत आहेत. त्यामध्ये वाहनांची वर्दळ आणि रस्त्यावरील धुलिकण सर्वाधिक कारणीभूत ठरत असून, त्याकरिता ठोस उपाययोजनांची गरज आहे. नाशिकचे आल्हाददायक वातावरण कायम ठेवण्यासाठी प्रशासनासह, प्रसारमाध्यमे तसेच नागरिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचा सूर ‘वायू प्रदूषण व प्रसारमाध्यमे संवेदीकरण’ कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान केंद्र (नीरी), नागपूर व द एनर्जी ॲण्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नाशिक महानगरपालिका व स्विस एजन्सी फॉर डेव्हलपमेंट ॲण्ड काॅर्पोरेशन यांच्या अंतर्गत ‘वायू प्रदूषण : प्रसारमाध्यम संवेदीकरण’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी माध्यमांचे सहकार्य मिळवणे’ या विषयावर केलेल्या सखोल चर्चेत प्रामुख्याने वाहनांची वर्दळ आणि धुलिकण वायू प्रदूषणास सर्वाधिक कारणीभूत ठरत असल्याचा सूर व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर नाशिकच्या हवेची गुणवत्ता खालावण्यास उद्योग, वाहतूक, रस्त्यावरील धूळ, निवासी वीटभट्या, बांधकाम, स्मशानभूमी, स्टोनक्रशर, बेकरी, ओपन इट आउट, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट हे ११ क्षेत्रे कारणीभूत असल्याचा निर्वाळा चर्चेदरम्यान व्यक्त करण्यात आला.

यावेळी टेरीचे वरिष्ठ फेलो आर. सुरेश आणि नीरीचे वैज्ञानिक राहुल विजय व्यवहारे यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींसमवेत उत्सर्जन यादीवर तांत्रिक तपशील सादर केले. आर. सुरेश म्हणाले की, ‘वायू प्रदूषणाचे स्रोत ओळखणे ही वायू प्रदूषण कमी करण्याची पहिलीच पायरी आहे. सामान्य माणसांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदूषणासंबंधी योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकार राहुल रनाळकर, मिलिंद कुलकर्णी, वैशाली बालाजीवाले, रिकिन मर्चंट, सौरभ बेंडाळे यांनीदेखील वायू प्रदूषणावर आपले मत व्यक्त करताना माध्यमांची नेमकी भूमिका स्पष्ट केली. राहुल व्यवहारे यांनी आभार मानले.

उद्योग आणि वाहन कारणीभूत

२०२१ च्या नाशिक शहर आणि जिल्ह्यासाठी उत्सर्जन यादीच्या निकालांवरून असे दिसून आले की, कणिक पदार्थ प्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत. यात उद्योगांचा मोठा वाटा आहे. त्यानंतर वाहतूक क्षेत्राचा क्रमांक लागतो. उद्योगांमधून ४४ तर वाहतूक क्षेत्रातून ३० टक्के कणिक पदार्थ हवेत मिसळतात. त्याचबरोबर शहरातील वाहतूक, रस्त्यांवरील धूळ, बेकरी, निवासी बायोमास जाळणे हेदेखील कारणीभूत ठरत असल्याचे अभ्यासात प्रमुख निष्कर्ष नोंदविण्यात आले.

ई-व्हेइकलचा पर्याय : डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना वायू प्रदूषण टाळण्यासाठी ई-व्हेइकलचा पर्याय स्वीकारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी महापालिकडून लवकरच सार्वजनिक वाहतुकीसाठी ई-बसेसचा वापर केला जाणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर शहरातील तीन विभागांत तीन विद्युत दाहिनी उभारणे, १०६ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणे, व्हर्टिकल गार्डनची उभारणी, यात्रिकी झाडू वाहनांची खरेदी करण्याची प्रक्रिया लवकरच केली जाणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिकच्या हवेला ट्रॅफिक, धुलिकणांची बाधा ; गुणवत्ता खालावण्यात ११ क्षेत्रे कारणीभूत appeared first on पुढारी.

Exit mobile version