नाशिकप्रमाणे राज्यातही ‘विकेंड लॉकडाऊन’! पालकमंत्री भुजबळ यांची माहिती

नाशिक : कोरोना रुग्णांची संख्या जिल्हा आणि शहरात झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली जात आहेत. दरम्यान नाशिकमध्ये मागच्या चार आठवड्यापासून विकेंड लॉकडाऊन करण्यात आले होते त्याप्रमाणे आता राज्यात देखील आठवड्यातील दोन दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज झालेल्या  राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत  राज्यभरात 30 एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्रीमंडळाच्या ऑनलाईन बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येथे दिली.

नाशिकचा पॅटर्न आता राज्यातराज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना नाशिक शहरात कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी शनिवार व रविवारी जीवनावश्‍यक वस्‍तू वगळता अन्‍य दुकाने बंद ठेवण्याच्‍या निर्बंधांचा हा चौथा आठवडा आहे. मागील चार आठवड्यांपासून नाशिकमध्ये विकेंड लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. याच्याच धर्तीवर राज्यात देखील विकेंड लॉकडाऊन करण्यात आले आहे. पूर्ण लॉकडाऊन नसला, तरी विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. हे निर्बंधाची उद्या (ता.०५) रात्री 12 पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या काळात राज्यात १४४ कलम लागू असणार आहे.

बस ड्रायव्हर - डिलिव्हरी बॉय यांचे लसीकरण

राज्यात शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत कडकडीत लॉकडाऊन असणार आहे. या काळात कारखाने , जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील. मात्र त्यांना नियम पाळावे लागतील. तसेच मॉल्स, सिनेमा-नाटक, वॉटर पार्क, समारंभ पुर्णपणे बंद राहातील तर बार-हॉटेल्स वर यांच्यावर कडक निर्बंध घालण्यात आलेले आहेत, पार्सल सुरू करावेत अशी सुचना करण्यात आली आहे. ऑफिसची कामे  होम टू वर्क वर भर  देण्यात येणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांमध्ये मिसळणारे ड्राइवर-कंडक्टर, डिलिव्हरी बॉय, कामगार इत्यादींना कोरोनाचे लसीकरण करुन घ्यावे लागणार आहे.

 - मायक्रो कॉन्टेमेंट झोन वर भर देणे

- शाळा-महाविद्यालय बंद

 - बांधकाम-कामगार राहणे योग्य व्यवस्था करणे; लसीकरण करणे

 - पाच लोक नमाज पठण करू शकतील

- ई कॉमर्स सुरू राहील

उद्या सरकारची सविस्तर सर्व नियमावली जाहिर करण्यात येणार आहे.