नाशिकमधील ‘त्या’ दोन घटनांवरुन चित्रा वाघ संतापल्या, केली ‘ही’ मागणी

चित्रा वाघ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

नाशिकच्या म्हसरूळ परिसरात द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात संस्थाचालकाने १४ वर्षीय मुलीस हातपाय दाबण्यास सांगून तिला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संस्थाचालक हर्षल ऊर्फ सोनू बाळकृष्ण मोरे (३२, रा. मानेनगर, म्हसरूळ) याच्या विरोधात पोक्सोसह, अत्याचार, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हसरूळ पोलिसांनी संशयित हर्षल मोरे यास अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वीच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येेथील आधारतीर्थ आश्रमात एका साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा खून झाल्याची घटना घडली. त्यानंतर हे आश्रम विनापरवाना असल्याचे बालसंरक्षण आयोगाच्या पाहणीत उघड झाले. याघटनेनंतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या आक्रमक झाल्या आहेत. चित्रा वाघ यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

नाशिक म्हसरूळ द किंग फाउंडेशन ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रमात संचालकानेच अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेविरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपीच्याही मुसक्या आवळण्यात आल्या असून दिपाली खन्ना महिला पोलिस अधिकारी अधिक तपास करत आहेत अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली आहे. त्याचबरोबर, राज्यातील सर्व आधार आश्रमांचे ऑडिट व्हावे. किती आधार आश्रम नोंदणीकृत आहेत आणि किती बेकायदेशीर रीत्या चालवले जाताहेत हे उजेडात आलेच पाहिजे. या संदर्भात सरकारकडे चौकशीसाठी मागणी करणार असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी व्हिडीओ ट्विट करुन माहिती दिली आहे.

The post नाशिकमधील 'त्या' दोन घटनांवरुन चित्रा वाघ संतापल्या, केली 'ही' मागणी appeared first on पुढारी.