नाशिकमधील धक्कादायक वास्तव! कोरोना रुग्णाला चक्क कारमध्ये सलाइन लावून उपचार, वैद्यकीय सेवेचे अक्षरशः धिंडवडे

नाशिक : मेट्रो शहराकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक शहरातील वास्तव दर्शविणाऱ्या या धक्कादायक प्रकाराने आरोग्य व वैद्यकीय सेवेचे अक्षरशः धिंडवडे निघाले. काय घडले नेमके? वाचा...

वैद्यकीय सेवेचे अक्षरशः धिंडवडे

शहरात कोरोना रुग्णांची संख्या दुपटी, तिपटीने वाढत आहे. रुग्णालयांत रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याने खाटादेखील शिल्लक नाहीत. महापालिकेचे कोविड सेंटर तर भरले आहेच. त्या शिवाय १४१ खासगी कोविड सेंटरमधील खाटाही भरल्या आहेत. सर्वसाधारण खाटा, तर सोडाच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळाल्यास तो रुग्ण भाग्यवान, अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. अशातच पंचवटी विभागातील खासगी कोविड सेंटरसह शहरात अन्य कोठेही खाटा न मिळाल्याने एका रुग्णाला श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला अक्षरशः कारच्या मधल्या सीटसवर झोपवून सलाइन लावण्याची वेळ नातेवाइकांवर आली.

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

पंचवटीतील धक्कादायक प्रकार; रुग्णांसह नातेवाईकही हतबल 

बेड अनुपलब्धतेचा प्रश्‍न कायम असतानाच कोविड रुग्णांसाठी आवश्‍यक असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागल्याने हताश नाशिककर रस्त्यावर उतरले आहेत. वैद्यकीय व आरोग्य सेवेच्या या दयनीय अवस्थेत रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू झाल्याचा प्रकार पंचवटी पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्यातून स्पष्ट झाला आहे, तर नाशिक रोड येथील रुग्णालयात मेडिकल बिलातून तब्बल २० हजार रुपये अतिरिक्त काढण्याचा डाव सोशल मीडियाच्या माध्यमातून हाणून पडला गेला. कोविड काळात मानवतेला काळिमा फासणारे एकेक प्रकार समोर येत आहेत. रविवारी आणखी एका घृणास्पद प्रकाराची भर पडली. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू 

वैद्यकीय सेवेचा बोजवारा 
संबंधित रुग्णाला श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने महापालिकेसह शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये प्रयत्न केले. परंतु तेथे बेड उपलब्ध झाला नाही. अस्वस्थता अधिक वाढल्याने पंचवटी विभागातील खासगी रुग्णालयात धाव घेतली तेथेही बेड नसल्याने रुग्णाला कारमधील मधल्या सीटवर झोपवून सलाइन देण्याची वेळ आल्याने शहरातील वैद्यकीय व आरोग्य सेवेची बिघडलेली परिस्थिती यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.