नाशिकमधील बांधकाम व्यावसयिकांनी सोडला सुटकेचा निःश्‍वास; पार्किंगच्या जाचातून सुटका

नाशिक : राज्याच्या नगरविकास विभागाने एकात्मिक विकास नियमावली लागू करण्याची अधिसूचना शुक्रवारी (ता.४) जारी केल्यानंतर नाशिकमधील बांधकाम व्यावसयिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. त्याला कारण म्हणजे नवीन नियमावलीतून बांधकाम व्यवसायाला अडचण ठरतील, अशा पार्किंगसारखे जाचक नियम दूर झाल्याने नाशिकमधील बांधकाम व्यवसाय आता अधिक गतीने प्रगती करणार आहे. 

पार्किंगच्या जाचातून सुटका, ॲमेनिटी स्पेस वाढविला 
२०१७ मध्ये नाशिक शहरासाठी दुसरा शहर विकास आराखडा व नियमावली मंजूर करण्यात आली होती. त्यात नाशिकसाठी पार्किंगचे किचकट नियम टाकले गेले. पार्किंगचे नियम किचकट करून ठेवल्याने नाशिककरांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली होती. अतिरिक्त पार्किंगमुळे बांधकामे बसत नव्हती. विशेषकरून छोट्या प्लॉटधारकांना बांधकामे शक्य नसल्याने करोडो रुपयांच्या प्रॉपर्टी अडकल्या होत्या. पूर्वीच्या नियमावलीत ४० चौरस मीटरच्या चार फ्लॅटसाठी एक कार, चार टू व्हीलर व चार सायकलींसाठी पार्किंग अनिवार्य होते.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

इमारतींमधील सामासिक अंतर वाढल्याने एक मजला वाढणार 

चाळीस ते ८० चौरस मीटरच्या एका फ्लॅटसाठी एक कार, चार टू व्हीलर व दोन सायकली, ८० ते १२० चौरस मीटरसाठीच्या एका फ्लॅटला दोन कार, दोन टू-व्हिलर व दोन सायकल, तर १२० चौरस मीटरपुढील एका फ्लॅटसाठी तीन कार, दोन टू-व्हिलर व दोन सायकल असे पार्किंगचे नियम होते. पार्किंगसाठी अधिक जागा सोडावी लागत असल्याने जेवढे पार्किंग तेवढा घरांचा आकार करावा लागत होता. याचाच अर्थ बांधकाम कमी होत होते. यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने अनेक ठिकाणी बांधकामांना ब्रेक लागला. पुणे, नागपूर, औरंगाबादसाठी मात्र पार्किंगचे नियम वेगळे होते. त्यामुळे नाशिककरांवर पार्किंगसंदर्भात अन्यायाची भावना निर्माण झाली होती. नव्या नियमावलीत मात्र या महत्त्वपूर्ण नियमातून सुटका झाली आहे. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

एफएसआयचा पूर्ण वापर 
नवीन नियमावलीत सायकल पार्किंग काढून टाकण्यात आला आहे. ३०-४० चौरस मीटर क्षेत्रातील दोन फ्लॅटसाठी एक कार, दोन टू व्हीलर, ४० ते ८० चौरस मीटर क्षेत्रातील दोन फ्लॅटसाठी एक कार पाच टू-व्हीलर पार्किंग सोडावी लागणार आहे. यामुळे पार्किंगची जागा कमी होऊन बांधकामाचे क्षेत्र वाढेल. 
 
ॲमेनिटी स्पेस वाढणार 
चार हजार चौरस मीटरपर्यंतच्या प्लाटवर ॲमेनिटी स्पेससाठी जागा सोडावी लागणार नाही. एक हेक्टरपर्यंत पाच टक्के त्यापेक्षा अधिक जागेवर विकासकांना दहा टक्के ॲमेनिटी स्पेस सोडावी लागणार आहे. 

नियमावलीत नाशिकसाठी महत्त्वाचे 
- सामासिक अंतर आता उंची अधिक पाच मजले याप्रमाणे सोडावे लागणार. 
- परवडणाऱ्या घरांसाठी १५ टक्के प्रीमियम शुल्क. 
- प्रीमियम एफएसआयचा दर ३५ टक्क्यांवर खाली. 
- नैसर्गिक नाल्यांवर सायकल ट्रॅक. 
- बाल्कनी बंद करण्यास परवानगी.