नाशिकमधील बौद्धिक वर्गाला आता निवासी दरानेच घरपट्टी; महासभेचा निर्णय

नाशिक : बौध्दीक क्षेत्रात गणना असलेल्या वकील, डॉक्टर, सनदी लेखापाल, कर सल्लागार व सॉलिसीटर यांचे घरात कार्यालय असले तरी त्यावर अनिवासी एवजी निवासी दरानेच घरपट्टी आकारण्याच्या प्रस्तावाला महासभेने मंगळवारी (ता. 19) रोजी मंजुरी दिली आहे. 

प्रस्ताव मंजुर करतांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालाचा आधार घेण्यात आला. पालिकेच्या उत्पन्नात घरपट्टीचे महत्वाचे योगदान असते. निवासी व अनिवासी असे घरपट्टीचे दोन प्रकार आहे. निवासी दर कमी तर अनिवासी दर प्रति चौरस फुटासाठी चार पट आकारला जातो. नाशिक शहरात वकील, डॉक्टर, सनदी लेखापाल, कर सल्लागार घरातूनच प्रॅक्टीस करतात. त्यांना अनिवासी दराने घरपट्टी आकारली जाते. मात्र गेल्या काही वर्षात बौध्दीक व्यवसाय करणाया व्यावसायिकांकडून घरात ऑफीस असले तरी निवासी दराने घरपट्टी आकारण्याची मागणी केली जात आहे. तर सर्वोच्च न्यायालयात काही व्यावसायिकांनी धाव घेतली आहे. 

विनाचर्चा प्रस्तावाला मंजुरी

त्यानुसार विविध कर विभागाकडून कायदेशीर सल्ला घेवून महासभेवर प्रस्ताव सादर केला होता. मंगळवारी (ता. 19) विनाचर्चा या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात सन १९८४ साली दावा दाखल झाला होता. व्ही शशीधरण यांच्या दाव्यात बौध्दीक व्यवसाय करणारे वकील, डॉक्टर, सनदी लेखापाल आदी निवासी वापराच्या ईमारतीत व्यवसाय करत असतील, तर त्यांच्याकडून निवासी दराने कर आकारणी करावी असे निकालात म्हटले होते. त्यानुसार सादर प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. 

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क

घरपट्टी वसुलीवर परिणाम

शहरात महिलांच्या वतीने घरांमध्ये छोट्या स्वरुपात व्यवसाय चालविले जातात. त्यावर तीन पट दंड आकारून घरपट्टी वसुल केली जात आहे. मध्यंतरीच्या काळात महापालिकेने मिळकतींचे सर्वेक्षण केले होते. मिळकतींचा वापर घरगुती कारणासाठी होतो कि व्यवसायासाठी हे तपासण्यासाठी मोहिम होती. त्यातून व्यवसाय होत असेल तेथे अनिवासी दराने घरपट्टी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट कोसळल्याने गृह उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने एकीकडे बौध्दीक वर्गाला निवासी दराने घरपट्टी लागु करण्याचा निर्णय झाल्यानंतर छोट्या व्यावसायिकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होण्यास मदत होणार आहे. 

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना