नाशिकमधील युवकाच्या खुनाचे खरे कारण आले समोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मित्राला विकलेला मोबाइल परत घेताना आर्थिक वाद झाल्याने त्यातून एकाने दुसऱ्या मित्राचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना भारतनगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. बुधवारी (दि.१९) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात परवेज अय्युब शेख (३१, रा. भारतनगर) याचा मृत्यू झाला आहे.

मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अकिब गुरफान इद्रिस सय्यद (२८, रा. भारतनगर) याने त्याचा मोबाइल परवेझ यास विकला होता. बुधवारी (दि.१९) रात्री दोघांची भेट झाली असता अकिब याने विकलेला मोबाइल परत देण्याची मागणी केली. मात्र, पैसे परत देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यात वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. दरम्यान, संशयित अकिब याने धारदार शस्त्राने परवेज याच्या पोटात भोसकले. यामुळे परवेज जागेवरच कोसळला. परवेज रक्तबंबाळ झाल्याचे पाहून अकिब याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्यास पकडले. त्यावेळी तेथून गुन्हे शाखेचे अंमलदार अप्पा पानवळ हे जात असताना त्यांनी तातडीने अकिब याचा ताबा घेत वरिष्ठांना माहिती दिली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकचे पथक व मुंबईनाका पोलिस घटनास्थळी गेले. त्यांनी परवेज यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले, तर अकिबचा ताबा घेतला. परवेजचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात अकिब विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित अकिब यास न्यायालयात हजर केले असता, त्यास रविवार (दि.२३)पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा –