नाशिकच्या सह्याद्रीच्या नऊ शिखरांच्या डोंगररांगेत अनेक ऐतिहासिक घटना, घडामोडींची ओळख देणाऱ्या अनेक जुन्या वास्तू आढळतात. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील वाघेरा किल्ल्यावर देखील अशाच इतिहासाच्या पाऊलखुणा सापडतात…
वाघेरा किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक विरगळी, जुन्या मुर्त्या, कोरीव दगड, दगडी तुळशी वृंदावन त्याला लागून समाधी, चुन्याच्या घण्याचे जुने दगडी चाक अश्या कित्येक ऐतिहासिक पाऊलखुणा सापडल्या आहेत….इतिहास अनेक अंगाने मांडला जातो कोणी पोवाडे गाऊन तर कोणी कवने, गीते व कथा सांगून, जुन्या जाणकार।माणसांच्या तोंडून हा इतिहास ऐकायला मिळतो. अनेक गावागावात इतिहास दडलेला आहे. मात्र शोधण्याची दृष्टी असली की इतिहासाचे दाखले, संदर्भ हाती लागतात. त्यासाठी तुमच्याकडे त्या त्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याची उर्मी लागते.
नाशिक जिल्ह्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी गेली २१ वर्षे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था काम करते आहे. आता “ऐतिहासिक पाउलखुणांचा शोध” अशी मोहीम ते राबवित आहेत.
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था याकामी अनुभव व जेष्ठांचे मार्गदर्शन घेऊन इतिहासाचा शोध तो ही दगडात कोरलेल्या ऐतिहासिक पाउलखुणांतून घेत आहे. याकामी इतिहास संशोधन व संशोधक यांची ही मदत संस्थेला मिळते आहे.
नाशिकच्या गडकिल्ले व त्यांच्या आजूबाजूंच्या गावाला अनेक इतिहासाचे दाखले तेथील दगडातून मिळतात. त्या दृष्टीने नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील वाघेरा किल्ला व त्याच्या पायथ्याशी परिसरातील गाव त्यात दडलेल्या काही दगडी पाऊलखुणा खूपच विविधता दाखवणाऱ्या आहेत.या ऐतिहासिक पाऊलखुणांचा शोध शिवकार्यचे संस्थापक राम खुर्दळ व दुर्गसंवर्धक जयराम बदादे यांनी घेतला असता अनेक ऐतिहासिक संदर्भ दर्शवणा-या पाऊलखुणा आढळल्या आहेत.त्या संदर्भात इतिहास संशोधन मंडळातील मंडळींकडून या बद्दल अभ्यासात्मक नोंदी तयार केल्या जाणार आहे. त्याबद्दल जाणकार व्यक्तींकडून अभ्यास केला जाईल तसेच अजूनही या भागात व गावात अनेक ऐतिहासिक घटनांची ओळख देणाऱ्या अनेक पाउलखुणांचा शोध घेतला जाणार असल्याची माहीती राम खुर्दळ यांनी दिली आहे.यानिमित्ताने इतिहासाच्या घटनांचा अभ्यास करता येईल व काही संदर्भ हाती लागतील असे दुर्गआभ्यासक राम खुर्दळ यांनी सांगितले.