नाशिकमधील सुंदर गावांची घोषणा, पाहा कोणती गावे सर्वात ‘सुंदर’

सुंदर गाव,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दरवर्षी राज्य शासनातर्फे स्व. आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कारांतर्गत जिल्हास्तरीय सुंदर गाव पुरस्कार निफाड तालुक्यातील थेरगाव आणि इगतुरी तालुक्यातील शिरसाठे या गावाला प्राप्त झाला आहे. तसेच १५ तालुक्यांतील १५ गावांना तालुकास्तरावरील सुंदर गाव पुरस्कारही घोषित करण्यात आले आहे. शुक्रवार (दि १७) पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी पुरस्कारप्राप्त गावांच्या नावांची घोषणा केली आहे. राज्य शासनाच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथीदिनी १६ फेब्रुवारीला हा पुरस्कार दिला जातो. नाशिक जिल्ह्यात १७ फेब्रुवारीला या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. तालुका स्तरावरील गावांना प्रत्येकी १० लाख तर जिल्हास्तरावरील गावांना ४० लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यासाठी पर्यावरणाचा समतोल, स्वच्छता, व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण आणि पारदर्शकता या पाच प्रमुख निकषांवर गावांची निवड करण्यात येते.

यानुसार जिल्हा स्तरावर निफाड तालुक्यातील थेरगाव आणि इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे या गावांना आदर्श गाव पुरस्काराने गौरविण्यात येईल. तालुकास्तरावर सुंदर ग्राम म्हणून प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे १५ गावांची निवड करण्यात आली. यामध्ये वडांगळी (सिन्नर), वेळुंजे (त्र्यंबकेश्वर), शिरसाठे (इगतपुरी), थेरगाव (निफाड), सुळे (कळवण), बोराळे (नांदगाव), राजदेरवाडी (चांदवड), दरी (नाशिक), भारदेनगर (मालेगाव), कोपुर्ली बु. (पेठ), महालखेडा पा. (येवला), पिंपळदर (बागलाण), करंजवण (दिंडोरी), वरवंडी (देवळा) आणि बुबळी (सुरगाणा) या गावांचा समावेश आहे.

हेही वाचा : 

The post नाशिकमधील सुंदर गावांची घोषणा, पाहा कोणती गावे सर्वात 'सुंदर' appeared first on पुढारी.