नाशिक : पुढारी वृत्तसेवा – महापालिकेतील होर्डिंग्ज घोटाळा राज्याच्या विधिमंडळात पोहोच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला असून, या घोटाळ्याच्या बहुचर्चित चौकशी अहवालाविषयी विचारणा केली आहे.
महापालिकेच्या जाहिरात व परवाने विभागातील कर्मचाऱ्यांनी करारातील अटी व शर्ती परस्पर बदलून संगनमताने कोट्यवधी रुपयांचा होर्डिंग्ज घोटाळा केल्याचा आरोप नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टाइझिंग वेल्फेअर असोसिएशनने जानेवारी २०२४ मध्ये केला होता. शहरातील खुल्या जागांवर जाहिरात होर्डिंग्ज उभारण्यासाठी महापालिकेने दि. १६ डिसेंबर २०२१ रोजी निविदा सूचना जारी करत २८ खुल्या जागांवर जाहिरात फलक उभारण्यासाठी दर मागविले होते.
निविदाप्रक्रियेअंती संबंधित मक्तेदाराला कार्यादेश देताना मात्र खुल्या जागांसह रस्ते, वाहतूक बेटे, दुभाजक, इमारती, उद्याने, वापरात असलेल्या व वापरात नसलेल्या जागा, बांधीव मिळकतींवर जाहिरात फलक उभारण्याची परवानगी देण्यात आली. निविदेत फक्त जाहिरात फलक असा उल्लेख असताना कार्यादेशात मात्र जाहिरात फलकाबरोबर प्रकाशित फलक, युनिपोल, एलईडी वॉल या सर्वांना परवानगी दिली गेली. महापालिकेच्या मालकीच्या जागेतील प्रकाशित, अप्रकाशित जाहिरात फलक, युनिपोल, एलईडी वॉलसाठी एकच दर लावले गेल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले. २८ ऐवजी ६३ ठिकाणी जाहिरात फलक उभारून महापालिकेचा कोट्यवधींचा कर बुडविला गेल्याचा आरोप असोसिएशनतर्फे करण्यात आला होता. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती तयार केली होती. तब्बल दोन महिन्यांनंतर हा चौकशी अहवाल आयुक्तांना सादर झाला. परंतु त्यावर कारवाई मात्र अद्यापही झालेली नाही. आता हा वाद तारांकित प्रश्नाद्वारे विधिमंडळात पोहोचला आहे.
दोषींवर कारवाई होणार
दानवे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे होर्डिंग्ज घोटाळ्याच्या चौकशी अहवालाविषयी विचारणा केली आहे. नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टाइझिंग वेल्फेअर असोसिएशनच्या आरोपात तथ्य आहे का, असा प्रश्न त्यांनी केल्यामुळे या घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करणे आता महापालिकेस क्रमप्राप्त झाले आहे. दरम्यान, तारांकित प्रश्नासंदर्भातील माहिती महापालिकेने शासनाकडे पाठविली आहे.
होर्डिंग्ज प्रकरणाबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. प्रश्नाच्या अनुषंगाने आवश्यक माहिती शासनाला कळविण्यात आली आहे. – विवेक भदाणे, उपायुक्त (जाहिरात व परवाने), महापालिका.
हेही वाचा: