नाशिकमध्ये आजपासून महाबौद्ध धम्म मेळावा, महाश्रामणेर शिबिर

श्रामनेर www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अखिल भारतीय समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महाबौद्ध धम्म मेळावा आणि महाश्रामनेर शिबिराचे आयोजन सोमवार (दि. २६) पासून नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर करण्यात आले आहे. यात १० दिवस विविध कार्यक्रम होणार असून, दि. ५ ऑक्टोबर रोजी या मेळाव्याचा समारोप होणार आहे, अशी माहिती या कार्यक्रमाचे आयोजक व बीएमए ग्रुपचे अध्यक्ष मोहन अढांगळे यांनी दिली.

मेळावा व महाश्रामणेर शिबिराची तयारी पूर्ण झाली असून, संपूर्ण शहरात ठिकठिकाणी झेंडे व फलक लावून वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळानजीक असलेल्या मुख्य रस्त्यावर सीबीएस ते त्र्यंबक रोड दरम्यान, भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, संत गाडगे महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या भव्य प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. तसेच शिबिराच्या ठिकाणी सभापीठ, मंडप उभारणी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह व्यवस्था, वाहनतळ, आसन व्यवस्था, भोजन कक्ष यासह अन्य व्यवस्था करण्यात आली आहे. भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती, धर्मांतर घोषणा वर्धापन दिन आणि धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून, सुमारे १ हजार धम्म उपासकांचे महाश्रामणेर शिबिर तसेच महाबौद्ध धम्म मेळावा होत आहे. या शिबिर व मेळाव्यास भदंत ज्ञानज्योती महाथेरो, भदंत बोधीपाल, भदंत धम्मरत्न, भदंत सुगत, भदंत आर्यनाग, भदंत शीलरत्न आदींसह देशभरातील भदंत व भिक्खुगण उपस्थित राहणार आहेत. तसेच मनोजराजा गोसावी (यवतमाळ ) व संच यांचा बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी प्रमुख मान्यवर व उद्घाटक म्हणून चंद्रबोधी पाटील (राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा), भीमराव य. आंबेडकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा), शंकर ढेंगरे (राष्ट्रीय महासचिव, भारतीय बौद्ध महासभा) उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद शंभरकर (जिल्हाधिकारी, सोलापूर), जयंत नाईकनवरे (पोलिस आयुक्त, नाशिक), भगवान वीर (उपआयुक्त, सामाजिक न्याय विकास, नाशिक), सुदर्शन नगरे (उपआयुक्त, आदिवासी विकास, नाशिक), डॉ. बाबूराव नरवडे (प्रादेशिक उपआयुक्त, पशुवैद्यकीय विकास), दिनेश बर्डेकर (डीवायएसपी, नाशिक), डॉ. दीपक खरात (सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विकास, औरंगाबाद), डॉ. प्रशांत नारनवरे (सामाजिक न्याय विकास आयुक्त, महाराष्ट्र राज्य), धम्मज्योती गजभिये (महासंचालक बार्टी, महाराष्ट्र राज्य), वंदना कोचुरे (उपआयुक्त सामाजिक न्याय विकास, मुंबई), सुभाष एंगडे (अपर आयुक्त एसजीएसटी, नाशिक), देवेंद्र सोनटक्के (असिस्टंट पीएफ कमिशनर, नवी मुंबई), किशोर मोरे (डीवायएसपी, नाशिक), रामचंद्र जाधव (माजी शिक्षण उपसंचालक, नाशिक) आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही मोहन अढांगळे यांनी दिली. या महाबौद्ध धम्म मेळावा व महाश्रामणेर शिबिरात सर्वांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश बनसोड, प्रदीप पोळ, राहुल बच्छाव, भदंत धम्मरत्न, के. के. बच्छाव, गुणवंत वाघ, बाळासाहेब शिरसाठ, अशोक गवई, नितीन मोरे, अरुण काशीद, शिवाजी गायकवाड, वाय. डी. लोखंडे, डी. एम. वाकळे आदी प्रयत्नशील आहेत.

गोल्फ क्लब मैदानावर भव्य डोम :

महाबौद्ध धम्म मेळावा आणि महाश्रामणेर शिबिरासाठी गोल्फ क्लब मैदानावर भव्य डोम तथा मंडप उभारण्यात आला असून, या मंडपावर सुमारे ३०० फुटांवर उंच आकाशात रंगीत बलून सोडण्यात आला आहे. या बलूनवर आकर्षक रंगांमध्ये कार्यक्रमाचा उल्लेख करण्यात आल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिकमध्ये आजपासून महाबौद्ध धम्म मेळावा, महाश्रामणेर शिबिर appeared first on पुढारी.