नाशिक : पुढारी वृत्तसेवा; कचरा निर्मूलनासाठी १७६ वरून ३५४ कोटींचा ठेका देऊन वाढत्या तक्रारींमुळे घंटागाडीचा तंटा कायम असताना गेल्या सात वर्षांपासून हुलकावणी देणारे स्वच्छ शहर स्पर्धेतील यश गाठण्यासाठी महापालिकेने रात्रीपाळीतही घंटागाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कचऱ्याच्या ‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनासाठी इंदूरच्या धर्तीवर कामगार वस्त्या, बाजारपेठांच्या परिसरात रात्रीच्या वेळी या घंटागाड्या चालविल्या जाणार आहेत. सद्यस्थितीत यासाठी नऊ अतिरिक्त घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ घेऊनही घंटागाडीच्या तक्रारी कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर घंटागाडीच्या अनियमिततेच्या चौकशी अहवालावर उशिराने का होईना कारवाई सुरू झाली असून, सहाही विभागांतील चारही घंटागाडी ठेकेदारांना प्रशासनातर्फे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ‘स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक’ची बिरुदावली मिरवणाऱ्या महापालिकेने घंटागाडीवर शेकडो कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, केंद्राच्या ‘स्वच्छ शहर’ स्पर्धेत अव्वल येण्याचे स्वप्न अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही. कचराकुंडीमुक्त शहर संकल्पनेतून घंटागाडी योजना राबविली जात असली तरी झोपडपट्ट्या, कामगार वस्ती तसेच बाजारपेठांच्या ठिकाणी असलेले कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट स्वच्छ शहर स्पर्धेतील महापालिकेच्या क्रमवारीत होणाऱ्या घसरणीस कारणीभूत ठरले आहेत. त्यामुळे आता या ब्लॅक स्पॉटच्या निर्मूलनासाठी रात्रीच्या पाळीत घंटागाड्या सुरू करण्याचा निर्णय घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे.
दिवाळीत दोन वेळा कचरा संकलन
दिवाळीच्या काळात घरांची स्वच्छता, रंगरंगोटी आदींमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्मिती होते. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रांत घंटागाडीद्वारे केरकचरा संकलन केले जाणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी घंटागाडी ठेकेदारांना दिले आहेत.
रात्रपाळीतील अतिरिक्त घंटागाड्या
नवीन नाशिक- २
नाशिक पूर्व- २
नाशिकरोड- १
नाशिक पश्चिम- २
पंचवटी- १
सातपूर- १
कामगार वस्ती, बाजारपेठा, व्यापारी संकुल, व्यावसायिक आस्थापना या ठिकाणी रात्री कचरा संकलनासाठी अतिरिक्त घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
– डॉ. आवेश पलोड, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग
हेही वाचा :
- मुंबईत एपीएमसीत कांद्याच्या दरात ५ रूपयांची वाढ; येत्या आठवड्यात १५ टक्के वाढीची शक्यता
- Pune Railway News : रेल्वेच्या पुणे-कोल्हापूर दरम्यान ११४ रेल्वे सेवा
- संत श्री सोपानकाका पालखीचे वाल्ह्यात स्वागत
The post नाशिकमध्ये आता रात्रीही फिरणार घंटागाडी appeared first on पुढारी.