नाशिकमध्ये उन्हाचा पारा चढला, तापमान ३८.३ अंशांवर

Temperature

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वायव्य भारताकडून येणाऱ्या उष्ण लहरींमुळे जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. नाशिक शहरात मंगळवारी (दि.२६) कमाल तापमानाचा पारा ३८.८ अंशांवर पाेहोचला आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वात उच्च तापमान असून, मार्चएन्डपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज आहे.

राजस्थानच्या दक्षिण भाग तसेच गुजरात राज्यातील सरासरी तापमानात २ ते ३ अंशांची वाढ झाली आहे. परिणामी, गुजरातला लागून असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवत आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये पारा चाळीस अंशांपलीकडे जाऊन पोहोचला आहे. तर नाशिकमध्येही कमाल तापमान ३८ अंशांच्या वर पोहोचले आहे. किमान तापमानाचा पाराही २०.२ अंशांवर जाऊन ठेपला आहे. परिणामी, उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी चार यावेळेत उन्हाचा सर्वाधिक जोर असताे. त्यामुळे या कालावधीत रस्ते ओस पडत आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागातही ऊन चांगलेच तापत असल्याने शेतीच्या कामांवर विपरीत परिणाम होत आहे.

सध्याचे हवामान कोरडे आहे. त्यामुळेच पुढील तीन ते चार दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार आहे. या काळात नाशिकसह नंदुरबार, धुळे तसेच मराठवाडा व विदर्भामधील कमाल तापमानात अधिक वाढ होईल, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला आहे.

दक्षिण राजस्थान व गुजरातमध्ये कमाल तापमानात सरासरी दोन ते तीन अंशांची वाढ झाली आहे. त्याचा परिणाम गुजरात व राजस्थानला लागून असलेल्या राज्यांमध्ये जाणवतो आहे. त्र्यंबकेश्वर, नाशिकसह धुळे व नंदुरबारमध्ये मागील तीन दिवसांपासून तीव्र उष्णता जाणवत आहे. मार्च एन्डपर्यंत हे वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे.

– माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ


हेही वाचा –

The post नाशिकमध्ये उन्हाचा पारा चढला, तापमान ३८.३ अंशांवर appeared first on पुढारी.