नाशिकमध्ये उभी राहणार राज्यातील पहिली मुलींसाठीची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था

लष्करात मुली,www.pudhari.news

नाशिक : गौरव जोशी

राज्यातील मुलींसाठीची पहिली सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था नाशिकमध्ये उभी राहणार असून, शासनाने मंगळवारी (दि.१०) यासंदर्भात आदेश काढले आहेत. जूनपासून या संस्थेत ३० विद्यार्थिनींची पहिली तुकडी प्रशिक्षणासाठी दाखल होणार आहे. या संस्थेमुळे लष्करात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुलींच्या पंखात बळ भरणार आहे.

केंद्र सरकारने पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) मुलींचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्राच्या प्रयत्नांना राज्यभरातून साथ लाभावी, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने नाशिकमध्ये राज्यातील मुलींकरिता असलेली पहिली सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था उभारण्यास शासनाने मंजुरी देतानाच त्यासाठी आवश्यक पदभरती व निधीही उपलब्ध करून दिला आहे.

शहरातील माजी सैनिकांच्या मुलांच्या व मुलींच्या वसतिगृह इमारतीमध्ये ही संस्था कार्यान्वित हाेणार आहे. जून २०२३ व जून २०२४ अशी सलग दोन वर्षे प्रत्येकी ३० विद्यार्थिनींच्या तुकडीला प्रवेश दिला जाणार आहे. औरंगाबाद येथील मुलांच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या नियंत्रणात ही संस्था काम करणार आहे. संस्थेसाठी शासनाने एक कोटी ७० लाख ६५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या संस्थेसाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी शासन स्तरावर प्रयत्न केले. त्यामुळे भविष्यात नाशिकमधील सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेतून खडतर शिक्षण घेतलेल्या राज्यातील मुली या पुण्याच्या एनडीएमध्ये व त्यानंतर देशसेवेसाठी सैन्यदलात प्रतिनिधित्व करताना दिसतील.

११ पदांना शासनाची मान्यता

नाशिकच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेकरिता शासनाने ११ पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यामध्ये नियमितचे पाच व बाह्य यंत्रणेद्वारे सहा पदे भरण्यात येणार आहे. नियमित पदांमध्ये अधीक्षिका, गृहपाल, लिपिक तसेच शारिरिक प्रशिक्षण निदेशक (महिला) दोन ही पदे आहेत. तसेच बाह्ययंत्रणेतील सहा पदांमध्ये शिपायापासून ते स्वयंपाकीपर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा : 

The post नाशिकमध्ये उभी राहणार राज्यातील पहिली मुलींसाठीची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था appeared first on पुढारी.