नाशिकमध्ये उष्मा कायम; जिल्ह्यात लासलगाव ठरले ‘हॉट’, पारा 42 अंशांवर

उष्‍णतेचा पारा वाढला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात लासलगाव येथे शनिवारी (दि.13) उच्चांकी 42 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, उष्णतेच्या लाटेमुळे शहर परिसरातील जनजीवन ठप्प झाले. नाशिकमध्येही उष्मा कायम असल्याने शहरवासीय हैराण झाले आहेत. भुसावळला तर 45.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून, खानदेशही तीव्र उन्हाने अक्षरक्ष: भाजून निघत आहे.

गेल्या आठवडाभरापासून उष्णतेची लाट पसरली आहे. वाढत्या उष्म्यामुळे सर्वसामान्य होेरपळून निघत आहे. जिल्ह्यात लासलगाव सर्वाधिक हॉट ठरले आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच तेथील पारा 42 अंशांवर जाऊन पोहोचला. सकाळपासूनच उष्णतेचा जोर जाणवत असल्याने, त्याचा परिणाम शहरातील दैनंदिन जीवनावर झाला. दुपारी 12 ते 4 यावेळेत उन्हाचा अधिक चटका बसत असल्याने रस्ते ओस पडले. उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी लासलगाववासीयांनी एसी, कूलर व पंख्यांची हवा घेणे पसंत केले. उन्हाच्या तीव्र झळांमुळे तीन दिवसांनंतर होरपळून निघालेल्या नाशिकच्या पार्‍यात घसरण झाली असली, तरी शहरात उष्णतेची लाट कायम आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे शनिवारची सुट्टी नाशिककरांनी दिवसभर घरातच वेळ व्यतित केला. सायंकाळनंतर नागरिक सहकुटुंब फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले. शहरात 38.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान, मालेगाव शहराबरोबरच ग्रामीण भागातही प्रचंड उकाडा जाणवत आहे. त्यामुळे जनता हैराण झाली आहे. पुढील काही दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.

भुसावळ, जळगाव तापले
खानदेशही उष्णतेच्या लाटांनी होरपळून निघत आहे. भुसावळला आज 45.9, तर जळगावला 45 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 43.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

हेही वाचा:

The post नाशिकमध्ये उष्मा कायम; जिल्ह्यात लासलगाव ठरले ‘हॉट’, पारा 42 अंशांवर appeared first on पुढारी.