नाशिकमध्ये एक्स बँड डॉप्लर रडारसाठी पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांना साकडे 

नाशिक : मुंबईसाठी पाच डॉप्लर रडार देत असताना उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक मध्यवर्ती ठिकाणी एक्स बँड डॉप्लर रडारची आवश्‍यकता आहे. त्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना भौतिकशास्त्राचे अभ्यासक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी साकडे घातले आहे. कृषी क्षेत्राचे नुकसान टाळण्यासाठी नाशिकप्रमाणे मराठवाड्यासाठी औरंगाबादमध्ये हे रडार बसवावे, असाही मुद्दा त्यांनी अधोरेखित केला आहे. 

गारपीट, ढगफुटी आदीपासून कृषी क्षेत्राचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने पाऊल उचलणे आवश्यक आहे, असे सांगून  जोहरे म्हणाले, की डॉप्लर रडारची अचूकता वाढविण्यासाठी विशाखापट्टणम आणि कोलकोता येथे प्रत्यक्ष तांत्रिक अभ्यास करण्याची संधी मिळाली होती, असे स्पष्ट केले. २०१४ मध्ये राज्यातील २९ जिल्ह्यांत गारपीट होऊन नुकसान झाले. त्यावर हवामान बदल समजून घेत उपाय झाले, तर निश्चित व थेट फायदा शेतकऱ्यांना होईल. अन्नधान्याची होणारी नासाडी टाळणे शक्य होईल. नाशिकमध्ये चांदवड तालुक्यात, तर औरंगाबादसाठी पिंपळदरी (ता. सिल्लोड) गावात रडार बसविले जावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

राज्यातील मॉन्सून व चक्रीवादळांच्या बदलत्या पॅटर्नमुळे तालुका व गावनिहाय वातावरण बदलले आहे. ढगफुटी व गारांच्या पावसाची पूर्वसूचना मिळाली, तर शेतकरी आणि शेती अन् उद्योगांद्वारे अर्थव्यवस्थेला मदत होणार आहे. मॉन्सूनचा पॅटर्न बदल आणि उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात दुष्काळी, कमी पावसाचे क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात आता ढगफुटी अथवा पाऊस-गारपीट वाढली आहे. ढगातील कणांची माहिती मिळते. त्यामुळे पावसाची खात्रीशीर माहिती देणारी डॉप्लर रडार यंत्रणा ही जगभर आपत्कालीन यंत्रणा म्हणून प्रभावीपणे वापरली जात आहे. डॉप्लर रडार विद्युत चुंबकीय लहरी ढगांवर सोडते. डॉप्लर रडारच्या सहाय्याने पावसाची, ढगफुटीची, गारपिटीची माहिती चार ते सहा तास आधी अगदी सहज मिळू शकते. रडारच्या परिघात पाऊस, गारपीट अथवा ढगफुटी कुठे होणार, ढग वाऱ्यावर स्वार होत कोणत्या दिशेला जात आहेत आणि त्यात किती पाणी, कोणत्या स्वरूपात आहे हे घटकांचा चित्ररूप अभ्यास करून मिळते. किमान एक तास आधी १०० टक्के खात्रीपूर्वक अंदाज अचूक सांगता येतो.

राज्यात मुंबई, महाबळेश्वर, सोलापूर आणि नागपूर येथे हे रडार कार्यान्वित आहे. रडारमुळे भौगोलिक प्रदेशानुसार २५० ते १०० किलोमीटर परिघातील अचूक गारपिटीचा अंदाज प्राप्त होतो. यंदा मुंबईला आणखी चार रडार दाखल होणार आहेत. मुंबईला नव्याने दाखल होणाऱ्या चार एक्स बॅंड डॉप्लर रडारांनंतर ही संख्या पाच होईल. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

ढगांचा एक्स-रे 

एक्स बॅंड डॉप्लर रडार ढगांचा एक्स-रे काढते, असे सोप्या शब्दांमध्ये अभ्यासक सांगतात. योग्य वापराने ढगांकडून परतणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी ढगांतील अगदी बोटाच्या पेऱ्याएवढ्या भागातील बाष्प, बर्फ कण तसेच पाण्याच्या थेंबांच्या आकार व प्रकार अचूक, तसेच ढगफुटींची माहितीही एक्स बॅंडवर मिळते. रडार कोणत्या फ्रिक्वेन्सीवर ऑपरेट होते, त्यानुसार त्याचे वर्गीकरण विविध बॅंडमध्ये करण्यात आले आहे. एक्स बॅंड म्हणजे ८ ते १२ गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सीवर चालणारे डॉप्लर रडार होय.