नाशिकमध्ये ऑक्सिजन उपलब्धतेचे आभाळ फाटण्याची भीती; सिलिंडर-ड्युरा टँक खरेदीचे घोडे किमतीवर अडकलंय 

नाशिक : एकीकडे रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या मुबलक पुरवठ्याबद्दल घमासन सुरू असताना वैद्यकीय ऑक्सिजनच्या काही प्रकल्पांसाठी लिक्विड ऑक्सिजनचे टँकर नाशिकमध्ये रात्रीपर्यंत पोचू शकले नाहीत. त्यामुळे स्वाभाविकपणे ऑक्सिजनच्या उपलब्धतेचे आभाळ गुढीपाडव्याला (ता. १३) फाटण्याची भीती आहे. 

ऑक्सिजन उपलब्धतेचे आभाळ आज फाटण्याची भीती 
गरजेनुसार रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याऐवजी मोठ्या रुग्णालयांसाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन दिल्याच्या मुद्यावरून राज्याच्या एका मंत्र्यांनी सोमवारी (ता.१२) प्रशासनातील अधिकाऱ्यांवर धारेवर धरल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यातच लिक्विड ऑक्सिजनचे दोन टँकर पोचू शकले नसल्याची माहिती यंत्रणेपर्यंत धडकली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये काळजीचा सूर बळावला आहे. सद्यःस्थितीत दहा ते वीस टन ऑक्सिजनचा ‘शॉर्टफॉल’ आहे. त्यातच, पुन्हा लिक्विड ऑक्सिजनअभावी वैद्यकीय ऑक्सिजन तयार न झाल्यास काय करायचे? या प्रश्‍नाने मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला अधिकाऱ्यांच्या मनात रुंजन घातले आहे. त्यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील उद्योगांचा ऑक्सिजन बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे संकेत मिळताहेत. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

रुग्णालयांसाठी सिलिंडर-ड्युरा टँक खरेदीचे घोडे किमतीवर अडकलंय 
दरम्यान, खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा अखंडित रहावा म्हणून ड्युरा टँक घेण्यासंबंधीची सूचना रुग्णालयांना करण्यात आली होती. त्यानुसार आयएमएतर्फे खासगी रुग्णालयांकडून ड्युरा टँक घेण्यास तयार असलेल्या रुग्णालयांकडून माहिती मागवण्यात आली होती. त्यामध्ये शहरातील चाळीस रुग्णालयांनी ड्युरा टँक खरेदीची तयारी दर्शवली आहे. मात्र सिलिंडरप्रमाणेच ड्युरा टँक खरेदीचे घोंगडे किमतीवर अडकल्याचे आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. एक लाख ३० हजार रुपयांमध्ये मिळणाऱ्या ड्युरा टँकसाठी खासगी रुग्णालयांनी एक लाख ९० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. प्रत्यक्षात मात्र उत्पादक कंपन्यांकडून त्याची किंमत दोन लाख ६० हजारांपर्यंत सांगण्यात येत आहे. तसेच गेल्या वर्षी आठ हजार रुपयांना मिळणाऱ्या सिलिंडरसाठी २५ हजार रुपये द्यावे लागतात. ही बाब जिल्हा प्रशासनाला सांगण्यात आली आहे. ड्युरा सिलिंडरची किंमत अंतिम झाल्यास खरेदीचा मार्ग मोकळा होईल, असेही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू 

ड्युरा टँकच्या किमतीत फरक कसा? 
ड्युरा टँकच्या किमतीत इतका फरक कसा? हे ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडून जाणून घेण्यात आले. कंपन्यांच्या म्हणण्यानुसार एक लाख ९५ हजार रुपये किमतीच्या ड्युरा सिलिंडरमध्ये २०० लिटर ऑक्सिजन बसतो. मात्र त्याच्या ‘प्रेशर’चे प्रमाण २४ इतके असते. अडीच लाखांहून अधिक किमतीच्या ड्युरा सिलिंडरमध्ये २३५ लिटर ऑक्सिजन बसतो आणि त्याच्या ‘प्रेशर’चे प्रमाण ३६ इतके असून, ते अधिक मजल्यांसाठी उपयोगी पडते. त्यामुळे अशा परिस्थितीत खासगी रुग्णालयांसाठी ड्युरा टँक उपलब्ध करून देण्यासंबंधी जिल्हा प्रशासन तोडगा कसा काढणार, यावर अखंडित ऑक्सिजनची उपलब्धता अवलंबून असेल. 

महाविकास आघाडी-भाजप ‘पॅररल मोड’वर 
महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजनांच्या ‘मोड’वर महाविकास आघाडीप्रमाणे भाजपने समांतर कामाला सुरवात केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पालकमंत्री छगन भुजबळ आढावा बैठकी घेताहेत. कृषीमंत्री दादा भुसे यांनी आता मालेगावच्या बाहेर येऊन यंत्रणांच्या बैठकींना सुरवात केली आहे. त्याचवेळी भाजपने माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून विशेषतः रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्धतेवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपचे जगदीश पाटील आणि हिमगौरी आडके यांनी त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. एका कंपनीकडून २५ हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळवण्याची शाश्‍वती मिळवत त्यातील पाच हजार इंजेक्शन नाशिक महापालिकेच्या रुग्णालयासाठी उपलब्ध करुन देण्यापर्यंतचे प्रयत्न चालवले आहेत. याशिवाय आणखी सात खासगी रुग्णालयांना प्रत्येकी पाच हजार इंजेक्शन मिळवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती भाजपच्या गोटातून मिळाली.