नाशिकमध्ये कचऱ्यापासून आता ‘सीएनजी’ निर्मिती प्रकल्प

सिटीलिंक बससेवा, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती अर्थात ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प ठेकेदाराची अकार्यक्षमता आणि महापालिकेच्या अनास्थेमुळे अपयशी ठरल्यानंतर आता कचऱ्यापासून सीएनजी(नॅचरल कॉप्रेस्ड गॅस) तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याचे नियोजन महापालिकेच्या माध्यमातून केले जात आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या जागेतच हा प्रकल्प उभारला जाणार असून, या प्रकल्पात निर्माण होणारा सीएनजी सिटीलिंकच्या बसेसकरीता इंधन म्हणून वापरला जाणार आहे.

‘जीआयझेड’अंतर्गत जर्मन सरकारच्या सहकार्याने महापालिकने आंतरराष्ट्रीय पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत २०१७ मध्ये विल्होळी येथे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची उभारणी केली होती. या प्रकल्पासाठी सुमारे ६.८ कोटी रुपयांचे अनुदान महापालिकेला प्राप्त झाले. या प्रकल्पासाठी दररोज सुमारे २० मेट्रिक टन ओला कचरा १० किलो लिटर सार्वजनिक शौचालयातील मलजल अशा एकूण ३० मे. टन कचाऱ्यावर प्रक्रिया करून दरमहा ९९ हजार युनिट वीज निर्मिती केली जाईल, असा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता. ओल्या कचऱ्याद्वारे बायोगॅस (मिथेन) तयार करून त्याव्दारे वीजनिर्मिती करण्याची योजना होती. नोव्हेंबर २०१७ मध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रकल्प संचलनाची जबाबदारी ग्रीन अ‍ॅण्ड क्लीन सोल्यूशन (बेंगळुरू) या मक्तेदार कंपनीवर सोपविण्यात आली होती. त्यासाठी महापालिकेने संबंधित मक्तेदारासमवेत दहा वर्षांचा करार केला होता. प्रकल्पासाठी ओला कचरा, मलजल शहरातून वाहून आणण्याची जबाबदारी मक्तेदाराची होती. मात्र मक्तेदाराच्या दुर्लक्षामुळे या प्रकल्पातून अपेक्षित वीज निर्मिती होऊ शकली नाही. त्यामुळे मक्तेदार आणि महापालिकेत निर्माण झालेला वाद लवादापर्यंत पोहोचला. अखेर महापालिकेने सदर प्रकल्प ताब्यात घेत स्वत:च चालविण्यास सुरूवात केली आहे. मात्र वीज निर्मितीचे उद्दीष्टय साध्य होत नसल्यामुळे या प्रकल्पाचे रुपांतर सीएनजी निर्मिती प्रकल्पात करण्याची योजना महापालिकेच्या विचाराधीन आहे.

पुण्याच्या धर्तीवर प्रकल्प

पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये ओल्या कचऱ्यापासून सीएनजी निर्मिती प्रकल्प उभारण्याची योजना आहे. या प्रकल्पासाठी दररोज सुमारे सहा ते सात टन भाजीपाल्यासह अन्य ओला कचरा आवश्यक आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करून सीएनजी गॅस तयार केला जाईल. निर्मिलेला गॅस सिटीलिंकच्या सीएनजी बसेससाठी वापरला जाणार आहे.

ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प पथदर्शी आहे. मात्र आता या प्रकल्पाच्या ठिकाणी भाजीपाल्यासह ओल्या कचऱ्यापासून सीएनजी निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे.

– बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी), महापालिका.

हेही वाचा –