नाशिकमध्ये कब्रस्तान जागेचा वाद; अतिक्रमण हटविण्याच्या सूचना 

नाशिक : स्थायी समितीच्या पत्राचा आधार घेत मुस्लिम समाजाला कब्रस्तानासाठी दिलेल्या जागेचा प्रस्ताव रद्द केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी स्थायी समितीवर सविस्तर अहवाल सादर करण्याबरोबरच या भागातील दीड एकर जागेवरील अतिक्रमण हटविण्याच्या सूचना स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी दिल्या आहेत. 

अतिक्रमण हटविण्याच्या सूचना
गोदावरी नदीकिनारी असलेल्या अमरधामच्या मागील बाजूस लिंगायत, हिंदू गवळी, गोसावी दशनाम, नवनाथपंथीय, बौद्ध समाजातील अंत्यसंस्कारासाठी राखीव जागा आहे. लिंगायत समाजाच्या दफनभूमीच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना बाजूला असलेल्या सर्व्हे क्रमांक ३७२, ६३, ६४ व ६५ आणि ६९ मधील अंशतः भाग मुस्लिम समाजाला कब्रस्तानासाठी देण्याचा ठराव नगरसेविका समिना मेमन यांच्या पत्रावर स्थायी समितीमध्ये करण्यात आला होता. मात्र विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने जागा देण्यास विरोध करताना हिंदू समाजाची जागा अन्य समाजाला देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. महापौर सतीश कुलकर्णी, आयुक्त कैलास जाधव, स्थायी समिती सभापती गणेश गिते यांना विरोधाचे पत्र देताना आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

हेही वाचा > तरुणाकडून धक्कादायक वस्तू सापडताच पोलीसही हैराण! युवावर्गाला सहज मिळणाऱ्या गोष्टीचा लावणार शोध?

हिंदू व मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होईल अशी कृती टाळण्याचे आवाहन

त्यानंतर ठराव रद्द करण्यात आला. अचानक ठराव रद्द झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर नगरसेवक समिना मेमन व राहुल दिवे यांनी स्थायी समितीमध्ये विषय मांडला. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून तसेच कुठल्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेऊन कब्रस्तानासाठी जागा द्यावी, हिंदू व मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होईल अशी कृती टाळण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार सभापती गिते यांनी स्थायी समितीच्या पुढील सभेत अहवाल ठेवण्याच्या सूचना दिल्या. 

हेही वाचा > एकच व्यवहार आणि जर्मनीला उच्च शिक्षण घेण्याचे तरुणाचे स्वप्न क्षणार्धात भंगले!