नाशिकमध्ये काँग्रेसच्या शहराध्यक्षपदासाठी ओबीसी चेहरा? महापालिका निवडणुकांच्या तोंडावर त्वरित होणार बदल

पंचवटी (नाशिक) : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेल्या नाना पटोले यांची नियुक्ती आली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष शरद आहेर यांची उपाध्यक्षपदी बढती झाल्याने काँग्रेस नाशिक शहराध्यक्षपदासाठी नवीन चेहऱ्याचा शोध सुरू झाला आहे. 

नवीन चेहऱ्याचा शोध सुरू
राज्याध्यक्ष निवडताना सोशल इंजिनिअरिंगकडे काँग्रेसश्रेष्ठींनी विशेष महत्त्व दिल्याचे दिसून येते. ओबीसी चेहऱ्यांचा विचार पक्षीय पातळीवर करण्यात आला. त्या अनुषंगाने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून भाई जगताप यांची नियुक्ती झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष ठरविताना श्रेष्ठींनी ओबीसी चेहऱ्याला पसंती दिली. तोच विचार नाशिक जिल्ह्यात सोशल इंजिनिअरिंग विचार होऊ शकतो. मागील वर्षी जिल्हाध्यक्ष म्हणून ‘मविप्र’ संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांची नियुक्ती झाली होती. या पार्श्‍वभूमीवर शहराध्यक्षपदी ओबीसी चेहऱ्याचा विचार केला जात असल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

ओबीसी चेहऱ्याचा विचार व्हावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा
कधीकाळी नाशिक शहर व जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असली, तरी आज शहरासह जिल्ह्यातही पक्षाची अवस्था क्षीण झाली आहे. महापालिकेतील १२२ पैकी केवळ सहा नगरसेवक निवडून आले आहेत. त्यातही पंचवटी विभागात पक्षाला भोपळाही फोडता आलेला नाही. या स्थितीत संघटना बांधणीचे मोठे आव्हान असेल. त्यातच जिल्ह्यात एकमेव आमदार असल्याने सोशल इंजिनिअरिंग गरजेचे असून, त्यासाठी ओबीसी चेहऱ्याचा विचार व्हावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

अनेक लोकांची नावे चर्चेत
ओबीसी चेहरा म्हणून अध्यक्षपदासाठी नाशिक शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय राऊत यांचे नाव चर्चेत आहे. शिवाय नगरसेवक राहुल दिवे, गटनेते शाहू खैरे, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्यासह अनेक लोकांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हे बदल त्वरित होणार असल्याची पक्षपातळीवर चर्चा आहे.