नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतय, थोरातांना आधीच सावध केलं होतं : अजित पवार

अजित पवार, बाळासाहेब थोरात,www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

पदवीधर निवडणूकीत नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतय अशी माहिती कानावर आली होती. त्यादृष्टीने  बाळासाहेब थोरात यांना मी आधीच सावध केलं होतं. आदल्या दिवशीच त्यांना तशी कल्पना मी दिली होती. मात्र ते म्हणाले तुम्ही काळजी करु नका, आमच्या पक्षाचं आम्ही बघू… अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

नाशिक पदवीधर निवडणूकीत अर्ज सादर दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठे राजकीय नाट्य घडले. कॉंग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली, मात्र त्यांनी माघार घेत उमेदवारी अर्ज भरलाच नाही. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपल्या मुलाचा सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने कॉंग्रेसला अखेरच्या क्षणी घडलेल्या या राजकीय नाट्याचा जबर धक्का बसला. कॉंग्रेस सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात बोलताना, नाशिकमध्ये काहीतरी वेगळं घडेल याबाबत आपल्याला आधीच कल्पना मिळाली होती, कॉंग्रेस नेत्यांना तसे सांगितले होते. अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

सत्यजित तांबे यांच्यासह 22 जण या निवडणूकीच्या रिंगणात आहे. पक्ष सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचे नाना पटोले यांनी आधीच जाहीर केले आहे. नाशिक निवडणुकीबाबत हायकमांडला अहवाल दिला असून हायकमांडकडून जे निर्देश येतील त्याप्रमाणे पक्ष कारवाई करेल असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरता पक्षाची फसवणूक केल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

The post नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतय, थोरातांना आधीच सावध केलं होतं : अजित पवार appeared first on पुढारी.