नाशिकमध्ये कोरोनाची वर्षपूर्ती; सध्याची परिस्थिती जास्त गंभीर?

नाशिक : गेल्या वर्षी आजच्याच तारखेला नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. मात्र, वर्षपूर्तीनंतर कोरोना बाधितांचा आकडा 1 लाख 71 हजारांवर जाऊन पोहोचला असून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतोय. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा हा एक वर्षाचा प्रवास कसा होता. वाचा विशेष रिपोर्ट.

29 मार्च 2020 खरं तर हा दिवस नाशिककर अजूनही विसरू शकलेले नाहीत. कारण याच दिवशी जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला होता. चीनमधील कोरोनाचा विषाणू हळूहळू थेट नाशिकपर्यंत पोहोचेल असं कधी नाशिककरांना वाटलं नव्ह्तं. मात्र, गेल्या वर्षी 29 मार्चला लासलगाव या ग्रामीण भागातील एका 30 वर्षीय बेकरी व्यावसायिक तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. 12 मार्चला ताप तसेच खोकला येत असल्याने त्याने एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते. मात्र, तरी देखील प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने 25 मार्चला तो ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला असता न्यूमोनिया सदृश्य लक्षणं दिसल्याने त्याला नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार 27 मार्चला तो जिल्हा रुग्णालयात येताच त्याचा स्वॅब घेऊन पुण्याला पाठवण्यात आला आणि 29 मार्चला त्याचा अहवाल पॉझीटिव्ह आला.

या रुग्णांवर उपचार करणारे डॉ. निखिल सैंदाणे म्हणाले, की सर्वात पहिले आम्ही कंटेनमेंट झोन तयार केला. बेकरी व्यवसायिक असल्याने तो अनेक ठिकाणी फिरून आला होता. 150 लोकांचे आम्ही काँटॅक्ट ट्रेसिंग केले, इतर जिल्ह्यातही तो जाऊन आला होता. नगरला गेला होता. तिथेही काँटॅक्ट ट्रेसिंग केले. पहिलीच केस असल्याने भीतीचे वातावरण होते. ट्रीटमेंट प्रोटोकॉलपासून सगळेच प्लॅनिंग केले होते. त्याच्यवर योग्य उपचार केले आणि तो सुखरूप बरा झाला.

हा रुग्ण बरा होऊन घरी गेला. त्यानंतर मात्र कोरोनाची पहिली लाट सुरु झाली आणि हळूहळू कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत गेली. दरम्यान गेल्या वर्षभरातील कोरोनाची ही आकडेवारी बघुयात

29 मार्च 2020 - 1

29 एप्रिल 2020 - 280

29 मे 2020 - 922

29 जून 2020 - 2911

29 जुलै 2020 - 10302

29 ऑगस्ट 2020 - 22970

29 सप्टेम्बर 2020 - 38490

29 ऑकटोबर 2020 - 17795

29 नोव्हेम्बर 2020 - 7466

29 डिसेंबर 2020 - 8982

29 जानेवारी 2021 - 5695

28 फेब्रुवारी 2021 - 6996

29 मार्च 2021 - 49025

या संदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी माहिती दिली. नो कोरोना ईन नाशिक असे वातावरण आपल्याकडे होते. पण एक पेशंट लासलगावला निघाला. आम्ही आपत्ती निवारण कक्ष स्थापन केला होता. त्यानंतर पहिल्या लाटेत खूप प्रयत्न करत आपण बाहेर पडलो होतो. वारंवार अशी सूचना येत होती की दुसरी लाट येईल म्हणून, फेब्रुवारीपर्यंत रुग्णसंख्या कमी होती. पण आता दुसरी लाट खूप मोठी आहे. पहिल्या लाटेत 16 हजार रुग्ण होते. मात्र दुसऱ्या लाटेत आपण 4 आठवड्यात हा टप्पा ओलांडला, आता खूप मोठं आव्हान आहे. आता नागरिक नियमांचे पालन करत नाहीत, काळजी घेत नाहीत ही मोठी समस्यां आमच्यासमोर आहे, नागरिकांमध्ये बदल होणे गरजेचे आहे. आता व्यवस्था पण वाढवली आहे. स्वॅब टेस्टिंग दिवसाला 10 हजारांहून अधिक होताहेत, बेड्स वाढवले. ऑक्सिजन क्षमता वाढवली पण आपण चौपट तयारी करतोय पण संकट दहा पट येते आहे.

कोरोनाची दुसरी लाट येताच नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत असून सध्या एकूण कोरोना रुग्णसंख्या 1 लाख 71 हजार 735 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 1 लाख 44 हजार 531 रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचं प्रमाण 84.11 टक्के आहे. आतापर्यंत 2 हजार 326 बाधितांचा मृत्यू झालाय तर 24 हजार 979 कोरोनाग्रस्तावर आता उपचार सुरु असून अचानक झालेल्या या रुग्णवाढीमुळे आरोग्य यंत्रणाही पूर्णतः कोलमडलीय. विशेष म्हणजे पुन्हा एकदा नाशिक लॉकडाऊन होण्याची दाट शक्यता आहे.

एकंदरीतच काय तर वर्षभराचा नाशिकमधील कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आलेख हा धडकी भरवणारा आहे. कोरोनाचा धोका कधी टळेल याचा अंदाज अद्याप कोणीही बांधू शकत नसून तो नियंत्रणात यावा यासाठी प्रशासन प्रयत्न करतंय. मात्र, दुसरीकडे आता नागरिकांची देखील तेवढीच जबाबदारी असून नाशिककरांनो कोरोनाला हरवायचे असेल तर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करा आणि स्वतःसह स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या.