नाशिकमध्ये कोरोनाच्या संशयित रुग्णांकडून गुपचूप HRCT चाचणी करुन घरीच उपचार

नाशिक : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं समोर आलं असतानाच तिकडे नाशिक शहरात शासकीय आकडेवारीपेक्षा प्रत्यक्षात कित्येकतरी पटीने अधिकचे रुग्ण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कोरोना चाचणीऐवजी कोणताही वैद्यकीय सल्ला न घेता नागरिक गुपचूपपणे थेट HRCT चाचणी करुन घरीच उपचार घेत असल्याचं समोर येत आहे. यामुळे महापालिकेने आता शहरातील सर्व HRCT सेंटरला नोटीस पाठवल्या आहेत.

नाशिक शहर हे सध्या कोरोनाचे केंद्र बनले असून रोज रुग्णसंख्येत झपाट्याने होणारी वाढ ही प्रशासनाची चिंता वाढवत आहे. गेल्या आठवडाभरातच शहरात तब्बल 5 हजार 337 नवे कोरोनाबाधित आढळून आले. 15 मार्चपर्यंत एकूण रुग्णांची संख्याही 88 हजार 340 वर जाऊन पोहोचली आहे. कोरोनामुळे 1 हजार 66 जण दगावले असून सध्या 6 हजार 731 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र या शासकीय आकडेवारीपेक्षा कित्येकतरी पटीने शहरात कोरोना रुग्ण कोरोना बॉम्ब म्हणून फिरत असल्याचा संशय महापालिकेकडून वर्तवला जात आहे. कोरोनाची लक्षणं दिसून येताच कोरोना चाचणीऐवजी कोणताही वैद्यकीय सल्ला न घेता संशयित रुग्ण गुपचूपपणे थेट HRCT चाचणी करुन घरीच उपचार घेतात, असं महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आलं त्यानंतर महापालिकेने शहरातील सर्व HRCT सेंटरला नोटीस बजावली आहे. नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक बापूसाहेब नागरगोजे यांनी ही माहिती दिली.

एखाद्या नागरिकामध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचं दिसून येताच अशा रुग्णाबाबत तातडीने आरोग्य विभागाला कळवणे सिटी स्कॅन सेंटरला बंधनकारक आहे. याबाबत शहरातील 29 सेंटरला सूचना केल्या आहेत तसेच नागरिकांनी देखील कोरोनाची लक्षणं जाणवताच योग्य ती खबरदारी घेणं तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार घेणं गरजेचं असल्याचं मत महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक बापूसाहेब नागरगोजे यांनी व्यक्त केलं आहे. अनेक नागरिक परस्पर HRCT टेस्ट करुन लक्षण दिसत असतानाही शहरात फिरत असल्याबाबत आमच्याकडेही आजपर्यंत अनेक तक्रारी आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

HRCT टेस्ट म्हणजे नक्की काय? ती का केली जाते? कोरोना आजारात ही टेस्ट का महत्त्वाची आहे? हे आम्ही रेडिओलॉजिस्टकडून जाणून घेतलं. HRCT टेस्टमध्ये छातीचे स्कॅनिंग केले जाते यात फुफुप्सामध्ये न्यूमोनियाचा संसर्ग किती प्रमाणात झालाय याचे निदान होते. कोरोनाचा न्यूमोनिया बाकीच्या न्यूमोनियापेक्षा अगदी भिन्न असतो आणि या टेस्टमध्ये ते लगेच दिसून येते त्यामुळे ही टेस्ट महत्वाची मानली जाते, ही टेस्ट करण्यासाठी 1 ते 2 मिनिटांचा कालावधी लागतो तसेच त्याचा रिपोर्टही एखाद्या तासातच प्राप्त होत असतो.

कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच संबंधित रुग्णाची HRCT टेस्ट केली जाऊन त्या माध्यमातून कोरोना विषाणूचा शरीरात किती संसर्ग झालाय याचे निदान होते. मात्र कुठलाही वैद्यकीय सल्ला न घेता संशयित रुग्ण ही चाचणी करुन लक्षणं दिसत असतानाही घरगुती उपचार करतो तसंच शहरात बेफिकीरपणे वावरत असल्याने आरोग्य विभागासाठी ही बाब डोकेदुखी ठरते आहे. महापालिकेला दररोजचा अहवाल आम्ही पाठवत असल्याचं HRCT केंद्रांकडून सांगितलं जात आहे. मात्र जर असं होत नसेल तर ही नक्कीच गंभीर बाब असून आरोग्य विभागानेही आता याकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. गैरमार्गाने जर असे प्रकार होत असतील तर त्याचाही शोध प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.

कोरोनाला रोखण्याची जबाबदारी तुमचीही असल्याने बेजबाबदारपणा टाळा आणि प्रशासनाला सहकार्य करा, असं आवाहन महापालिकेने नागरिकांना केलं आहे.