नाशिकमध्ये कोविड रुग्‍णालयांतील ८३.८३ टक्‍के बेड रिक्त; अवघे ५०७ बाधित रुग्‍णालयात दाखल

नाशिक : जिल्‍ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, सर्वाधिक कोरोना बाधित नाशिक महापालिका क्षेत्रात आढळून येत आहेत. सध्या नाशिक शहरात उपचार घेत असलेल्‍या कोरोना बाधितांची संख्या ६ हजार ७३१ असली तरी, यापैकी रुग्‍णालयात अवघे ५०७ बाधित दाखल आहेत.

त्‍यामूळे शहरातील ८३ रुग्‍णालयांत उपलब्‍ध असलेल्‍या ३ हजार १३६ राखीव खाटांपैकी २ हजार ६२९ खाटा अर्थात ८३.८३ टक्‍के रिक्‍त आहेत. २६१ व्‍हेंटीलेटर बेड्‌सपैकी २१२ बेड्‌स उपलब्‍ध आहेत. तर कोरोना केअर सेंटरमधील सर्व ४८० खाटा रिक्‍त आहेत. 

बाधितांवर गृहविलगीकरणातून उपचार

शहरातील विविध उपनगरीय भागांतून रोज नव्याने कोरोना बाधित आढळून येत आहेत. असे असले तरी गृहविलगीकरणातून उपचार उपलब्‍ध झालेले असल्‍याने प्रत्‍यक्ष रुग्‍णालयात दाखल असलेल्‍या बाधितांची संख्या तोकडी आहे. नाशिक शहरात शासकीय व खासगी असे मिळून ८३ रुग्‍णालयांत कोरोना बाधितांवर उपचारासाठी ३ हजार १३६ खाटा आरक्षित ठेवलेल्‍या आहेत. यापैकी सध्या ५०७ खाटा भरलेल्‍या आहेत. अर्थात ५०७ बाधित रुग्‍णालयांतून उपचार घेत आहेत. सामान्‍य विभागातील १ हजार ७६ खाटांपैकी १ हजार ०३१ खाटा रिक्‍त आहेत. १ हजार २६१ ऑक्‍सिजन बेडपैकी १ हजार ००९ खाटा रिक्‍त असून, ५२४ आयसीयु बेडपैकी ३७७ बेड रिक्‍त आहेत. कोरोना केअर सेंटरमधील सर्व ४९० खाटा रिक्‍त आहेत. एकंदरीत नाशिक महापालिका क्षेत्रात कोविड-१९ रुग्‍णांसाठी राखीव ठेवलेल्‍या खाटांपैकी रिक्‍त असलेल्‍या खाटांचे प्रमाण ८३.८३ टक्‍के इतके आहे. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू