नाशिकमध्ये ‘कोव्हिशील्ड’ लशीचे उद्दिष्ट असफल; दोन दिवसांत फक्त १२७ आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लस

नाशिक : दररोज तीनशे लाभार्थ्यांना कोव्हिशील्ड लस देण्याचे उद्दिष्ट साध्य न झाल्याने आता पुन्हा नव्याने मोहीम राबविली जाणार असून, जुने व नवीन बिटको रुग्णालय आणि पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात लसीकरण होणार आहे. शनिवार (ता. १६)पासून ही मोहीम सुरू झाली. पहिल्याच दिवशी तीनशे लसीकरणाचे उद्दिष्ट निश्‍चित केले होते. मात्र, फक्त १२७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

दोन दिवसांत फक्त १२७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस 

उर्वरित १७३ आरोग्य कर्मचाऱ्यांना मंगळवार (ता. १९)पासून लस दिली जाणार आहे. तीनदा संधी देऊनही लसीकरणासाठी पुढे येणार नाहीत, त्यांना लस दिली जाणार नसल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयाकडून कोव्हिशील्ड लसीचे १६ हजार डोस महापालिकेला प्राप्त झाले. शनिवारपासून आठ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

उद्दिष्ट असफल; आजपासून पुन्हा मोहीम 

आता पुन्हा लसीकरण केले जाईल. त्यासाठी तीन पथके कार्यरत राहतील. एका पथकात डॉक्टर, सिस्टर, डाटा एंट्री ऑपरेटर, तर शिपाई असे चार कर्मचारी राहतील. एका पथकाकडून दिवसाला किमान शंभर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच