नाशिकमध्ये क्षयरोग रुग्ण संपर्कातील व्यक्तींची शोधमोहीम

क्षयरोग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मागील महिन्यात नाशिक मनपाने शहरात केलेल्या सर्वेक्षणात क्षयरोगाचे 25 रुग्ण आढळले असून, त्यांच्या संपर्कातील त्यांचे कुटुंबीय तसेच आजूबाजूच्या नागरिकांचाही शोध घेतला जात आहे. अशा या शोधमोहिमेत आतापर्यंत 19 व्यक्ती आढळून आल्या आहेत. या संबंधित 19 जणांना कोणतीही लक्षणे नाहीत. परंतु, संसर्ग झाल्याचे निदान झाल्याने पुढे हा आजार बळावू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपचार सुरू करण्यात आले आहेत.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार गेल्या महिन्यात 17 ते 30 सप्टेंबर या कालावधीत नाशिक महापालिकेच्या क्षयरोग निर्मूलन विभागातर्फे शहरात सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरामध्ये 25 सक्रिय रुग्ण आढळून आले. या सक्रिय रुग्णांमुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्य वा आजूबाजूच्या रहिवाशांना संसर्ग झाला आहे की नाही याबाबत माहिती मिळून वेळीच त्यांच्यावर उपचार सुरू व्हावेत, यासाठी केंद्र शासनाने नव्याने मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले असून, दि. 1 ऑक्टोबरपासून अशा प्रकारची संबंधित 25 सक्रिय क्षयरोग रुग्णांच्या घरातील सदस्य तसेच आजूबाजूच्या रहिवाशांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे.

या तपासणीत आतापर्यंत 19 व्यक्तींना नुकताच क्षयरोगाचा जंतूसंसर्ग झाल्याचे आढळून आले असून, त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याचे मनपाच्या सहायक आरोग्य अधिकारी तथा शहर क्षयरोग निर्मूलन अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांनी दिली. संबंधित
19 व्यक्तींना लक्षणे नसली तरी त्यांचा जंतूसंसर्ग वाढू नये आणि सक्रिय क्षयरोग रुग्णांपर्यंत त्यांची स्टेज जाऊ नये याकरिता त्यांच्यावर तत्काळ प्रतिबंधात्मक उपचार सुरू करण्यात आले आहेत. या उपचारामध्ये रुग्णांना दोन प्रकारचे उपचार दिले जातात. त्यापैकी एक म्हणजे सहा महिने कालावधीपर्यंत दररोज एक गोळी आणि दुसरा उपचाराचा प्रकार म्हणजे तीन महिने कालावधीत आठवड्यातून एकदा प्रतिबंधात्मक गोळी दिली जाते.

नाशिक महापालिकेला राज्यस्तरावर प्रथमश्रेणी
नाशिक शहरात एकूण 2,300 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील बहुतांश रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. परंतु, नव्याने केलेल्या सर्वेक्षणात आढळलेल्या रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू करून त्यांच्यापासून इतरांना बाधा पोहचू नये, याची दक्षता घेतली जात आहेत. तसेच केंद्र शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार राज्यातील महापालिकांपैकी नाशिक मनपाने प्रथमश्रेणीचे काम केले असून, शहरी व ग्रामीण स्तरावरील कामगिरीत मनपाला द्वितीयश्रेणी प्राप्त झाली आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये क्षयरोग रुग्ण संपर्कातील व्यक्तींची शोधमोहीम appeared first on पुढारी.