नाशिकमध्ये खासगी यंत्रणेकडून रुग्णांची लूट! रविवारी ‘एचआरसीटी’करिता द्यावा लागतोय अधिकचा दर

सिडको (नाशिक) : कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी पालकमंत्री रस्त्यावर उतरून जनजागृती, तर जिल्हा प्राधिकरण २४ तास सतर्कता बाळगत आहे. मात्र, या संसर्गाची लाट ही संधी मानत खासगी तपासणी यंत्रणा रुग्णांची लूट करीत असल्याचा प्रकार शनिवारी (ता.२७) उघडकीस आला. संबंधितांकडून दर रविवारी रुग्णांकडून अधिकचे पैसे घेतले गेले असल्याची बाब निदर्शनास आली. दरम्यान, जिल्हा यंत्रणा संसर्ग नियंत्रणात आणण्याच्या नावाखाली बैठकांवर बैठका घेत आहे अन्‌ दुसरीकडे खासगी यंत्रणेकडून रुग्णांची लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नवीन नियमावलीद्वारे एचआरसीटी करणाऱ्या डायग्नोस्टिक सेंटरने रुग्णाला अडीच हजार रुपये दर आकारावे, असे आदेशित केले आहे. असे असताना जुन्या पंडित कॉलनीतील समर्थ डायग्नोस्टिक सेंटरने रविवार हा सुटीचा दिवस असल्याचे सांगत अत्यावश्‍यक सेवा म्हणून अधिकचे पाचशे रुपये रुग्णांच्या नातेवाइकांकडून घेतले. ही बाब रुग्ण नातेवाइकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याचा जाब संबंधितांना विचारला. संबंधितांनी वेळ मारून नेली. दरम्यान, जिल्हा प्राधिकरणाने रविवारी खासगी रुग्णालयांसाठी अत्यावश्‍यक सेवा दर अधिकचे घ्यावेत, असे काही निर्देश दिले असतील तर त्या संदर्भात जनतेला अवगत करावे, अन्यथा संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी रुग्णांच्या आप्तस्वकीयांनी ‘सकाळ’शी बोलताना केली. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न 

 
जुन्या पंडित कॉलनीतील समर्थ डायग्नोस्टिक सेंटर रुग्णांकडून रविवारच्या दिवशी ५०० रुपये जास्त दर आकारत आहे. शासनाचे नियम त्यासंदर्भात असतील, तर आमचे काही म्हणणे नाही. मात्र, नसतील तर जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती कायद्यांतर्गत संबंधित सेंटरचा परवाना रद्द करून कारवाई करावी. 
प्रशांत जाधव, सामाजिक कार्यकर्ते, सिडको 

शासनाच्या आदेशाप्रमाणे पाच हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये दर ‘एचआरसीटी’करिता करण्यात आले आहे. परंतु इमर्जन्सी व केवळ रविवारकरिता पाचशे रुपये चार्जेस अधिक आकरण्यात आले होते. ते पूर्ववत करू. 
- डॉ. हेमंत बोरसे, संचालक, समर्थ डायग्नोस्टिक सेंटर, नाशिक 
 
 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ