नाशिकमध्ये गोरगरिबांसाठी निःशुल्क ऑक्सिजन बेडचे महाराष्ट्रातील पहिले कोविड सेंटर! 

सिडको (जि.नाशिक) : महापालिकेच्या सहकार्याने व खासगी डॉक्टरांच्या मदतीने आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या गोरगरीब रुग्णांसाठी निःशुल्क ऑक्सिजन बेडसह महाराष्ट्रातील पहिले कोविड सेंटर बनणार आहे. वाचा सविस्तर...

खासगी डॉक्टर, मनपाच्या सहकार्याने उभारणी 
नाशिकमधील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह व बाळासाहेब ठाकरे प्रबोधिनी विद्यामंदिरात अत्याधुनिक सुविधांनी युक्त, सुसज्ज कोरोना सेंटर येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. सध्या नाशिक शहराचा विचार करता सिडको परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचा समावेश होताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये सिडकोतील रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक वैद्यकीय सेवेअभावी पूर्णतः मेटाकुटीस आले आहेत. या सर्वांचा सारासार विचार करून बडगुजर यांनी सिडकोवासीयांसाठी सावतानगर येथील सावरकर सभागृह व रायगड चौकातील बाळासाहेब ठाकरे विद्या प्रबोधिनी या महापालिकेच्या शाळेत कोविड सेंटर उभारण्याची मागणी महापालिका आयुक्तांना केली होती. त्यास परवानगी मिळाली असून, पुढील दोन दिवसांत या ठिकाणी सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे.हा मान शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या वाट्याला आला आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक व सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  

सध्याच्या घडीला मदत करण्याचे आश्वासन

सावरकर सभागृहामध्ये ऑक्सिजनचे एकूण ६० बेड व इतर १०० बेड असे एकूण एक हजार १६० बेडची व्यवस्था केली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा फौजफाटा नेमला आहे. त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्टाफ व स्वयंसेवक असणार आहेत. परिसरातील खासगी डॉक्टरांनी भरतीची तयारी दर्शविली आहे. यात डॉ. किरण बिरारी, डॉ. तुषार शिंदे, डॉ. भूषण कुलकर्णी, डॉ. छाया गाढवे, डॉ. त्रिवेंद्र शिंदे, तसेच एकूण पाच नर्स त्यांनी सध्याच्या घडीला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारे खासगी डॉक्टरांच्या मदतीने निःशुल्क ऑक्सिजन बेडचे रुग्णालय उभारण्याची तयारी सुरू आहे. याकरिता परिसरातील स्वयंसेवक, नर्स, डॉक्टर व नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. हातावर पोट भरणाऱ्या सिडकोतील कामगार वसाहतीतील रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांना याचा फार मोठा लाभ होणार आहे. याचे समाधान आहे. -सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना