नाशिकमध्ये ठक्कर डोम कोविड सेंटर सुरू होणार; महापौरांसह आमदार ढिकलेंकडून पाहणी

नाशिक : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रस्तावित ठक्कर डोम कोविड सेंटरची पाहणी केली. तीनशे खाटांचे कोविड सेंटरचे काम वेगाने सुरू असून, येत्या तीन ते चार दिवसांत कोरोनाबाधितांवर उपचार शक्य होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, सद्यःस्थितीत अडीच ते तीन हजार रुग्ण दररोज बाधित होत आहेत. महापालिका व खासगी हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या अपुरी पडत असून, नागरिकांचे बेड उपलब्धतेबाबत सातत्याने दूरध्वनी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठक्कर डोम कोविड सेंटरची पाहणी करण्यात आली. आमदार अॅड. राहुल ढिकले, महापालिकेचे सभागृहनेते सतीश सोनवणे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

महापालिकेने नाशिक-पुणे महामार्गावरील समाजकल्याण व पंचवटी भागातील मेरी येथील पंजाबराव देशमुख वसतिगृह येथे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. रुग्णांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. सद्यःस्थितीत डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात १५ व नवीन बिटको हॉस्पिटल येथे २१, असे एकूण ३६ व्हेंटिलेटर बेड कार्यान्वित असून, डॉ. झाकिर हुसेन येथे ९४ ऑक्सिजन बेड व नवीन बिटको हॉस्पिटल येथे २०५ ऑक्सिजन बेड कार्यान्वित आहे. सध्या ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने नवीन बिटको हॉस्पिटल येथे नव्याने २०० ऑक्सिजन बेड रुग्णांना उपलब्ध करून देण्याबाबत तातडीची कार्यवाही सुरू आहे. त्यापैकी ६० ऑक्सिजन बेड सुरू करण्यात आले आहे. उर्वरित बेडचे कामही लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती महापौर कुलकर्णी यांनी दिली. 
 

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

महापालिका प्रशासन व पदाधिकारी सातत्याने प्रयत्नशील राहून कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करावे व शहर कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे. 
-सतीश कुलकर्णी, महापौर, महापालिका