नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या विधानसभा प्रमुखाच्या वाहनाची तोडफोड

बाळासाहेब कोकणे गाडी फोडली,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवसेना ठाकरे गटाचे मध्य विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे यांच्या वाहनावर दगड फेकून नुकसान केल्याचा प्रकार गुरुवारी (दि.२०) सकाळी उघडकीस आला आहे. पंचवटीतील हनुमानवाडी परिसरातील भावबंधन मंगल कार्यालयाजवळ कोकणे यांच्या निवासस्थानाजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोकणे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. गुरुवारी (दि.२०) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने कोकणे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर दगड टाकून नुकसान केले. यात वाहनाची काच फुटली. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. त्यामुळे कोकणे यांनी पंचवटी पोलिसांकडे तक्रार केली आहे. शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर कोकणे यांच्यावर सुमारे दोन वर्षांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानंतर पुन्हा त्यांच्या वाहनाचे नुकसान केल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा निषेध नोंदवत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे निवेदन देत आरोपीस पकडण्याची मागणी केली आहे.

म्हणून ठाकरे गटावर हल्ले

ठाकरे गटाचे वर्चस्व वाढत असल्याने विरोधकांनी ठाकरे गटाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांवर हल्ले सुरु केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. असेच हल्ले होत राहिल्यास आम्ही मूग गिळून गप्प बसणार नाही. पोलिसांनी हल्लेखोरांना त्वरित पकडून त्यांना शिक्षा करावी. अन्यथा शिवसेना ठाकरे गटाला आपल्या स्टाईलने आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी निवेदनात दिला आहे. दरम्यान या प्रकरणाचा छडा लावून हल्लेखोरावर कारवाईचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी शिष्टमंडळात दिले आहे.

यांनी दिले निवेदन

निवेदन देताना खा. राजाभाऊ वाजे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, उपजिल्हा प्रमुख केशव पोरजे, देवानंद बिरारी, सचिन मराठे, महेश बडवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –