नाशिकमध्ये ठिकठिकाणी मद्यपींसह विक्रेत्यांवर कारवाई

मद्यपींवर कारवाई,www.pudhari.news

नाशिक : शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी मद्यसेवन व अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डी फाटा येथील सिडको रुग्णालयासमोरील मोकळ्या जागेत सात जणांनी मादक पदार्थाचे सेवन करीत सार्वजनिक शांतता भंग केली. सातही जण सोमवारी (दि. ६) सायंकाळी ७.३० च्या सुमारास विनापरवाना मद्य किंवा मादक पदार्थ सेवन करून आरडाओरड करताना आढळून आले. त्यामुळे अंबड पोलिस ठाण्यात ३३ ते ४८ वयोगटातील सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दुसऱ्या घटनेत सिमेन्स कंपनीजवळील आर. पी. स्विट्ससमोर तिघे जण विनापरवाना मद्यसेवन करीत आरडाओरड करताना सोमवारी (दि. ६) रात्री आठच्या सुमारास आढळून आले. या प्रकरणी अंबड पोलिस तपास करीत आहेत. तिसऱ्या घटनेत मोरवाडी येथे संशयित रमेश देवराम उंबरे (रा. मोरवाडी) हे अवैधरीत्या ३१ हजार ५०० रुपयांचा देशी मद्यसाठा करून विक्रीचा प्रयत्न करताना आढळले. त्यामुळे अंबड पोलिस ठाण्यात रमेश उंबरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने विहीतगाव परिसरात मंगळवारी (दि. ७) कारवाई करीत संशयित उमेश दीपक जाधव (३५, रा. विहीतगाव) याच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. संशयित उमेश हा अवैधरीत्या देशी मद्यविक्रीचा प्रयत्न करताना आढळून आला. त्याच्याकडून पोलिसांनी तीन हजार ३६० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये ठिकठिकाणी मद्यपींसह विक्रेत्यांवर कारवाई appeared first on पुढारी.