नाशिकमध्ये डेंग्यूचा डंख तीव्र, रुग्णसंख्या १६४ वर

डेंग्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरात डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या 15 दिवसांतच या आजाराचे तब्बल ६० नवे रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्येचा आकडा १६४ वर पोहोचला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे.

नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कायम असताना, आता डेंग्यूचा धोकाही वाढला आहे. एरवी पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण आढळतात. यंदा मात्र, उन्हाळ्यातच डेंग्यूने उचल खाल्ली होती. आता पावसाळा सुरू झाल्यानंतर तर या आजाराचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागल्याने वैद्यकीय विभागाच्या अडचणींत भर पडली आहे. गोविंदनगर परिसरातील ५० वर्षीय पुरुषाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्यामुळे या साथीचे गांभीर्य वाढले आहे. तुलनेत मे महिन्यापासून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मे महिन्यात डेंग्यूचे शहरात ३५ रुग्ण आढळले होते. पाठोपाठ जूनमध्ये तर डेंग्यूचा प्रकोप पाहायला मिळत आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात डेंग्यूचे १६८ संशयित रुग्ण आढळले असून, त्यापैकी ६० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

डास निर्मूलनासाठी महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली धूर फवारणी, जंतुनाशकाची फवारणी मोहीम केवळ कागदावरच राहिल्याने डेंग्यूसारख्या आजारांची साथ वाढत असल्याचे बोलले जात आहे.

साथरोगांचा प्रादुर्भाव वाढणार

गतवर्षी शहरात तब्बल १,१९१ डेंग्यूबाधित आढळले होते. त्यापैकी डिसेंबर २०२३ मध्ये तिघांचा बळी डेंग्यूमुळे गेला होता. शहरात स्वाइन फ्लूचाही प्रादुर्भाव वाढला आहे. या आजारामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ जणांचा बळी गेला आहे. पाठोपाठ मलेरियाच्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्याने साथरोगांचा प्रादुर्भाव वाढणार असल्याच्या राज्याच्या आरोग्य विभागाच्या संकेतांना बळकटी मिळाली आहे.

डेंग्यू पाठोपाठ मलेरियाचीही साथ

नाशिकमध्ये स्वाइन फ्लू, डेंग्यू पाठोपाठ आता मलेरियानेही दस्तक दिली आहे. शहरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढले असतानाच, व्यवसायानिमित्त नाशिकमध्ये आलेल्या तीन परप्रातीयांना मलेरियाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नाशिक पश्चिम, सातपूर आणि नाशिकरोड या तीन विभागांत डेंग्यूची लागण झालेला प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. तीनही रुग्ण उपचारानंतर घरी परतले असले, तरी शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लू पाठोपाठ मलेरियाचाही धोका वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

मे पाठोपाठ जून महिन्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. व्यवसायानिमित्त शहरात आलेल्या तिघांना मलेरियाची लागण झाली असून, उपचारानंतर तिघेही बरे झाले आहेत.

-डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, नाशिक महापालिका

——-०——–

हेही वाचा –