नाशिकमध्ये ‘डेंग्यू’ अलर्ट! महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर

dengue Kolhapur

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – येथे पावसाळा सुरू होत नाही, तोच डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून, या आजाराने गोविंदनगर भागातील ५० वर्षीय व्यक्तीचा बळी घेतल्यानंतर महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. रुग्ण आढळलेल्या परिसरात वैद्यकीय तसेच पथकामार्फत घरोघरी भेटी दिल्या जात असून, डेंग्यू रुग्णांबरोबरच डेंग्यू डासांच्या उत्पत्तिस्थानांचा शोध घेतला जात आहे.

येथे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कायम असताना आता डेंग्यूचा धोकाही वाढला आहे. एरवी पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण आढळतात. यंदा मात्र, उन्हाळ्यातच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले. ‘एडीस एजिप्ती’ या जातीचा डास चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते. या प्रजातीच्या डासांची पैदास पाच ते सात दिवसांहून अधिक काळ साचलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. वाढत्या उन्हामुळे यंदा कूलर, एसीचा वापर वाढला. कूलरमध्ये पाणी साचून राहात असल्यामुळे डेंग्यू आजारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती झाली. त्यामुळे उन्हाचा कडाका कायम असताना, शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. मे महिन्यात शहरात डेंग्यूचे तब्बल ३९ रुग्ण आढळले होते.

१२७ डेंग्यूबाधित रुग्ण

जूनमध्ये डेग्यू रुग्णसंख्येत वाढ होत असून, या वर्षातील पहिल्या बळीचीही नोंद झाली. गोविंदनगरमधील ५० वर्षी पुरुषाचा मृत्यू डेंग्यूमूळे झाला आहे. दि. १ जानेवारी ते ८ जून २०२४ या कालावधीतील डेंग्यू रुग्णसंख्येचा आकडा १२७ वर पोहोचला आहे. त्यामुळे महापालिकेने डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी वैद्यकीय विभागांतर्गत मलेरिया पथकांमार्फत घरोघरी भेटी देऊन पाणीसाठ्यांची तपासणी केली जात आहे. डेंग्यू डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीशी निगडीत ९२ नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

डेंग्यूची रुग्णसंख्या

महिना          बाधित रुग्ण
जानेवारी           २२
फेब्रुवारी            
मार्च                २७
एप्रिल              १७
मे                   ३९
जून                 १७

शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे. गोविंदनगरमधील ५० वर्षीय डेंग्यूसदृश रुग्णाचा मृत्यू झाला असून, त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. गोविंदनगर परिसरात मलेरिया पथकामार्फत घरोघरी भेटी देऊन डेंग्यू डासांच्या उत्पत्तिस्थानांचा शोध घेतला जात आहे. – डॉ. नितीन रावते, मलेरिया अधिकारी तथा वैद्यकीय अधीक्षक. मनपा.

हेही वाचा: