नाशिकमध्ये डोळ्याच्या साथीचे दररोज पाचशेहून अधिक रुग्ण

Eye flue

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुंबई, ठाणे, पुण्यापाठोपाठ नाशिक शहरातदेखील डोळे येण्याची साथ बळावली असून, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दररोज सरासरी पाचशे रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या दहा दिवसांत महापालिकेच्या बिटको, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयासह ३० उपकेंद्रांमध्ये ३६०६ रुग्णांची नोंद झाली आहे. खासगी रुग्णालयांमधील रुग्णसंख्येचा आकडा यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची चिंता वाढली आहे.

डोळ्याच्या साथीचे गेल्या आठवड्यात १४४ रुग्ण होते, जुलैअखेर हा आकडा २५६ पर्यंत पोहोचला होता. परंतु, १ ऑगस्टपासून रुग्णांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने शहरात साथ वेगाने पसरत चालली आहे. गेल्या आठवडाभरात रुग्णसंख्येत दररोज पाचशेने वाढ होत आहे. सोमवारी (दि. ७) एकाच दिवशी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ४९० रुग्णांची नोंद झाली. गेल्या दहा दिवसांत शहरातील डोळ्यांच्या रुग्णांचा आकडा ३६०६ वर पोहोचला आहे. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या डोळ्याच्या साथीच्या रुग्णांचा आकडा याहून कितीतरी पटीने अधिक आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नागरिकांना अधिक दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

‘आय ड्रॉप’चा तुटवडा

दरम्यान, या साथीमुळे डोळ्यांच्या औषधांची आणि ‘ड्रॉप’ची मागणी वाढली आहे. अचानक मागणी वाढल्याने शहरात सध्या विविध कंपन्यांच्या ‘आय ड्रॉप’चा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे काही ठिकाणी औषधांच्या किमतीपेक्षा अधिक रक्कम रुग्णाकडून घेतली जात असल्याच्या तक्रारी आहेत. तर दुसरीकडे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मात्र पुरेसा औषधसाठा असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

शहरात डोळे येण्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. साथ नियंत्रणासाठी महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात आहेत. साथीची लागण होऊ नये, यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा आहे.

– डॉ. नितीन रावते, वैद्यकीय अधीक्षक, मनपा

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये डोळ्याच्या साथीचे दररोज पाचशेहून अधिक रुग्ण appeared first on पुढारी.