नाशिकमध्ये दररोज पंधरा हजार नागरिकांचे लसीकरण; नागरिकांचा वाढता प्रतिसाद

नाशिक : कोरोना नियंत्रणाच्या लसीकरणाला सुरवातीला ज्या फ्रंटलाइन वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा विरोध होता त्याच मोहिमेत सध्या ठिकठिकाणी प्रत्येक केंद्रावर नागरिकांची गर्दी वाढत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. नाशिक शहर व जिल्ह्याला आतापर्यंत २५ टक्के लसीचे डोस प्राप्त झाले असून, प्राप्त लसींपैकी ६० टक्क्यांहून अधिक लसीकरण पूर्ण झाले आहे. 

नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या ४८ लाखांच्या पुढे आहे. त्यात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ४५ वर्षांच्या पुढील साधारण २० लाख नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. जिल्ह्याच्या २० लाखांच्या गरजेच्या प्रमाणात प्रशासनाला पाच लाख चार हजार ६८० लसीकरणाचे डोस मिळाले असून, त्यापैकी साडेतीन लाखांच्या आसपास लसीकरण पूर्णत्‍वास आले आहे. रोज जिल्हाभरात १५ हजार नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद वाढता आहे. लस आणि लसीकरण मोहिमेविषयी सुरवातीला असलेल्या शंका-कुशंकांच्या पार्श्वभूमीवर सध्या मिळणारा प्रतिसाद लक्षणीय आहे. 

शहरी केंद्रावर प्रतिसाद 

नाशिक महापालिका क्षेत्रात सगळीकडे चांगला प्रतिसाद आहे. सकाळपासून विविध केंद्रांवर गर्दी होते. लसीकरणापूर्वीच्या टेस्टिंगबाबत मात्र सुरवातीला काही दिवस गोंधळ होता. लसीकरण करण्यापूर्वी आरटीपीसीआर करण्याचा नियम होता, तर काही केंद्रावर रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करून त्वरित लसीकरण होत असताना काही अपवादाची केंद्रे अशीही होती की, कुठल्याही टेस्ट न करताही लोकांना लसीकरण सुरू होते मात्र आता त्यातही सुसूत्रतता आली आहे. 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

लसीकरणाचा आढावा 

दरम्यान, नाशिक रोडला महापालिका प्रभाग सभापती जयश्री नितीन खर्जुल यांनी रविवारी लसीकरणाचा आढावा घेतला. सिन्नर फाटा येथील महापालिकेच्या लसीकरण केंद्राला भेट देऊन त्यांनी माहिती घेतली. नाशिक रोडला प्रभाग क्रमांक १९ मध्ये ८ मार्चपासून लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. रविवार दिवसअखेरपर्यंत दोन हजार ९१० नागरिकांनी लस घेतली आहे. प्रत्येक नागरिकाची ॲन्टिजेन टेस्ट करूनच लस दिली जात आहे. ४५ वर्षांच्या पुढील विविध आजार असलेल्या नागरिकांना प्राधान्य देऊन लस दिली जात असल्याने गरजू नागरिकांनी लसीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभाग सभापती जयश्री खर्जुल यांनी केले आहे.  

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा