Site icon

नाशिकमध्ये दसर्‍याच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍यानिमित्त विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यासह विविध बांधकाम प्रकल्पांवर ग्राहक व्हिजिट देताना दिसून आले. त्याचबरोबर कपडाबाजार, फूलबाजारातही दिवसभर ग्राहकांची लगबग दिसून आली. परिणामी दसर्‍या निमित्ताने बाजारापेठेत कोट्यवधींची उलाढाल झाल्याने व्यापारीवर्गही सुखावला आहे.

दसरा म्हटला की, खरेदीला उधाण असेच समीकरण आहे. दसर्‍याच्या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यातच व्यावसायिकांनी ग्राहकांवर ऑफर्सचा वर्षाव केल्याने, सकाळपासूनच ग्राहकांनी खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी केल्याचे दिसून आले. विशेषत: कपडाबाजारात अनेकांनी सहपरिवार खरेदीचा आनंद घेतला. त्याचबरोबर पूजेच्या साहित्यातही मोठी उलाढाल झाली. दसर्‍याच्या मुहूर्ताला रिअल इस्टेटमध्येही उत्तम वातावरण बघावयास मिळाले. अनेकांनी या शुभमुहूर्तावर नूतन घरात गृहप्रवेश केला. तसेच फ्लॅट व रो-हाउस यांची बुकिंग केली. गेल्या काही दिवसांपासून नवीन घरांबाबत विचारणा करण्यात येत होती. परंतु दसर्‍याच्या निमित्ताने चांगली बुकिंग झाली असून, रिअल इस्टेटमध्ये फिलगुड वातावरण असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक बाजारातदेखील उत्साह दिसला. ग्राहकांनी कर्ज पद्धतीने वस्तू खरेदी करण्यापेक्षा संपूर्ण रक्कम देत खरेदी करणे पसंत केले. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये प्रामुख्याने एलईडी, एलसीडी, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी यांना प्राधान्य देण्यात आले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर विविध सवलत योजना देण्यात आल्या होत्या. मोबाइल खरेदीतही ग्राहकांचा उत्साह दिसून आला.

वाहनविक्रीत वाढ
वाहन बाजारात मात्र नेहमीच्या तुलनेत यंदा अधिक उलाढाल झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. चारचाकीसह दुचाकींचीदेखील मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. अनेक ग्राहकांना दसर्‍याच्या मुहूर्तावर कार-दुचाकीची डिलिव्हरी घेता आली, तर काही दुचाकी तसेच कारला वेटिंग असल्याने अनेकांनी बुकिंगला प्राधान्य दिले.

नाशिक ः दसर्‍याच्या मुहूर्तावर शोरूममध्ये कुटुंबीयांसह खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना दुचाकींची डिलिव्हरी देताना कर्मचारी.

‘झेंडू’ला अच्छे दिन
दसर्‍याला झेंडूच्या फुलांचे महत्त्व अधिक असते. पूजेबरोबरच घराला तोरण हे झेंडूच्या फुलांचे असते. वाहनांनादेखील झेंडूच्या फुलांचे हार घातले जातात. त्याच पार्श्वभूमीवर झेंडू उत्पादक शेतकरी हे दसर्‍याच्या तोंडावर फुले येतील, असे नियोजन करत असतात. मात्र, ठिकठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकर्‍यांचे हे नियोजन काही प्रमाणात कोलमडले. मात्र, अशातही झेंडूंच्या फुलांना चांगला भाव मिळाल्याचे दिसून आले. दसर्‍याच्या दिवशी झेंडूला 90 रुपये किलो असा भाव मिळाल्याने शेतकरीवर्ग सुखावला. पुढे झेंडूच्या दरांनी शंभरी पार केल्याने झेंडूला अच्छे दिन आल्याचे दिसून आले.

एक्सयूव्हीला सहा महिने वेटिंग
सध्या एक्सयूव्ही कारला प्रचंड पसंती दिली जात आहे. तरुणाईचा एक्सयूव्हीकडे विशेष कल आहे. त्यामुळे जवळपास सर्वच कंपन्यांनी आपल्या एक्सयूव्ही कार बाजारात आणल्या आहेत. त्यामुळे अनेक ग्राहक एक्सयूव्ही घेण्याच्या विचाराने वाहन बाजारात पोहोचले होते. मात्र, एक्सयूव्ही कारला कमीत कमी सहा महिन्यांचे वेटिंग असल्याने अनेकांनी दसर्‍याच्या मुहूर्तावर केवळ बुकिंग करण्याला प्राधान्य दिले.

व्हिजिट, बुकिंग अन् पझेशन
दसर्‍यानिमित्त रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी तेजी दिसून आली. शहराच्या चहूबाजूने असलेल्या प्रकल्पस्थळी दिवसभर ग्राहकांच्या व्हिजिट सुरू होत्या. काही ग्राहकांनी तत्काळ बुकिंग केले. तर पूर्ण प्रकल्पाच्या ठिकाणी अनेक कुटुंबे नव्या घरात प्रवेश करताना दिसले. केवळ फ्लॅटच नव्हे तर रो-हाउस खरेदीकडेही ग्राहकांचा मोठा कल दिसून आला. काहींनी प्लॉट बुकिंगलाही प्राधान्य दिले.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये दसर्‍याच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल appeared first on पुढारी.

Exit mobile version