नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन दिन शनिवारी (दि. ९) साजरा होत असून, त्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे गुरुवारी (दि. ७) सायंकाळी ७ च्या दरम्यान नाशिकमध्ये दाखल झाले. ते शुक्रवारी सकाळी (दि. ८) ९.३० वाजता श्री काळारामाची पूजा व आरती करणार आहेत. तसेच दिवसभर आयोजित विविध पक्षीय कार्यक्रमांत ते हजेरी लावणार आहेत.
येथे प्रथमच मनसेचा वर्धापन दिन साजरा केला जात असून, त्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे. शहरभर होर्डिंग्ज लावण्यात आले असून, चौकाचौकांत मनसेचे झेंडे झळकत आहेत. दरम्यान, वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे तीन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून असणार आहेत. यादरम्यान, ते श्री काळारामाची आरती करण्याबरोबरच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. त्याचबरोबर वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित सभेत ते आगामी लोकसभा निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. मनसे युती किंवा आघाडीत सहभागी होणार की, निवडणुकीला स्वतंत्र सामाेरे जाणार याबाबत बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे राज ठाकरे यांच्याकडून दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कधीकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिक लाेकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून ते कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याकडेही लक्ष लागून आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या तीनदिवसीय दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या भूमिकेकडे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे.
जोरदार स्वागत
राज ठाकरे यांचे सायंकाळी ७ च्या सुमारास एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये आगमन झाले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीदेखील केली. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राज यांचे स्वागत केले. यावेळी हॉटेल परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात होर्डिंगबाजी केली.
The post नाशिकमध्ये दाखल : कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण appeared first on पुढारी.