नाशिकमध्ये दिवसाला होणार चार हजार कोरोना चाचण्या; खासगी लॅबची मदत घेणार

नाशिक : शहरात शंभर कोरोना चाचण्यांमागे चाळीस रुग्ण पॉझिटिव्ह सापडत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेची स्वतःची लॅब सुरू करतानाच आता स्थानिक खासगी लॅबच्या माध्यमातून साठ हजार तपासण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रतिदिन सरासरी चार हजार तपासण्या केल्या जाणार आहेत.

शहरात कोरोनाची मोठी लाट आली आहे. गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या लाटेपेक्षा भयंकर लाट असून, शंभर तपासण्यांमागे ४० रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने तपासण्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तपासणी झाल्यानंतर होम आयसोलेशनमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना ठेवले जाणार आहे. त्याव्यतिरिक्त ९१ खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेमार्फत मोठ्या प्रमाणात बेडची उपलब्धता करून देण्यात आली आहे. सेंट्रल बेड रिझर्व्हेशन सिस्टिमच्या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णालयांमध्ये बेडसंदर्भात माहिती दिली जात आहे.

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

अडीच हजार अहवाल प्रलंबित

लोकांशी अधिक संपर्क येत असलेल्या नागरिकांच्या तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या अडीच हजार चाचणी अहवाल प्रयोगशाळांमध्ये प्रलंबित असल्याने उपचारासाठी अडचण येत आहे. त्यामुळे आयुक्त कैलास जाधव यांनी स्थानिक लॅबच्या माध्यमातून तपासण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. दरपत्रकात दातार लॅबचे दर कमी आल्याने त्या लॅबला काम मिळण्याची शक्यता आहे. खासगी लॅबच्या माध्यमातून चार हजार तपासण्या केल्या जाणार आहेत.

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा