नाशिकमध्ये दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद; बाजार समिती वगळता सर्वत्र शुकशुकाट 

नाशिक : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला रविवारी (ता. १४) दुसऱ्या दिवशी नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. बाजार समिती वगळता सगळीकडे शनिवारप्रमाणेच आजही प्रतिसाद मिळाला. कोरोना वाढून लॉकडाउनपेक्षा संयम परवडला, अशीच सार्वत्रिक मानसिकता दिसून आली. त्यामुळे आता सगळ्यांना कोरोनाचा प्रसार कमी होण्याची आशा आहे. 

जिल्ह्यात पाच दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. साडेपाचशे ते आठशेच्या सरासरीने रोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी पुन्हा जिल्ह्यात एक हजार ५२२ नव्या रुग्णांची भर पडली. बरे झालेले वजाजाता ८३८ ने आपला ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा वाढून तो आता सात हजार २१७ झाला आहे. दहा हजारांच्या दिशेने निघालेल्या या रुग्णसंख्येला आवर घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यानुसार जीवनावश्यक वस्तू, वाहतूक व्यवस्था वगळता सगळीकडे शांतता होती. आज रविवारची सुटी असूनही रस्ते निर्मनुष्य होते. 

हेही वाचा - नाशिकमधील धक्कादायक घटना! कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पोलीस तपास सुरू

गंभीर कारवायांचा विचार 

दरम्यान, प्रतिबंधाला प्रतिसाद न देणाऱ्यावर गंभीर स्वरूपाच्या कारवाया करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तसे संकेत दिले आहेत. नागरिकांचा प्रतिसाद चांगला आहे. मात्र जे नागरिक नियमाचे पालन करणार नाहीत. त्यांच्यावर प्रशासनाने कारवाया करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेतर्फे शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करण्यात आल्या आहेत. भाजीबाजार व जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी मात्र लोक रस्त्यावर उतरतात. त्यामुळे त्या ठिकाणी वेळांचे नियोजन व्हावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

हेही वाचा - दुर्दैवी अपघात आणि महापालिका कर्मचाऱ्याचे अख्खे कुटुंब उध्वस्त; ५ वर्षीय चिमुरडा ठार, पत्नी गंभीर 
 

कोरोनाबाधितांचा आलेख 

तारीख बाधित वाढ मृत्यू एकूण मृत्यू 

५ मार्च २१ ३४३४ १३ ५ २१२७ 
६ मार्च २१ ३७०९ २७५ ६ २१३३ 
७ मार्च २१ ३९४६ २३७ १ २१३४ 
८ मार्च २१ ४२२६ २८० ६ २१४० 
९ मार्च २१ ४३६९ १७० ९ २१४९ 

१० मार्च २१ ५१७१ ७७५ ६ २१५५ 
११ मार्च २१ ५७०८ ५३७ ३ २१५८ 
१२ मार्च २१ ६३७९ ६७१ ८ २१६६ 
१३ मार्च २१ ७२१७ ८३८ २ २१६८ 

नागरिकांचा निर्बंधांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, तो तसाच पुढे चालू राहावा, अशी अपेक्षा आहे. गर्दी टाळणे हाच संसर्ग टाळण्याचा सर्वांत प्रभावी उपाय आहे. आज काही आस्थापनांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली ते प्रमाण हळूहळू वाढवण्यात येईल व कारवायादेखील गंभीर प्रकारच्या करण्यात येतील. 
-सूरज मांढरे (जिल्हाधिकारी, नाशिक)